बंदला शंभर टक्के प्रतिसाद
By admin | Published: October 15, 2015 01:53 AM2015-10-15T01:53:41+5:302015-10-15T01:53:41+5:30
अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेने आॅनलाइन फार्मसीच्या विरोधात १४ आॅक्टोबरला एकदिवसीय बंदला पेणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
पेण : अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेने आॅनलाइन फार्मसीच्या विरोधात १४ आॅक्टोबरला एकदिवसीय बंदला पेणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पेणमधील शहर व ग्रामीण अशी २५ दुकानांचे शटर डाऊन ठेवून पेण मेडिकल फार्मासिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त सहभाग घेऊन आॅनलाइन फार्मसीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कडकडीत बंद पाळला. सकाळी संघटनेचे अध्यक्ष मितेश शहा यांच्यासह सर्व औषध विक्रेते यांनी एकत्रितपणे अखिल भारतीय औषध विक्री संघटनेने पुकारलेल्या बंदला सशर्त पाठिंबा देवून बंद पाळला.
संपूर्ण देशात व राज्यात बेकायदा आॅनलाइन औषध विक्री व्यवसाय सुरू असून याद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सीरप यासारख्या धोकादायक औषधांची विक्री होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून देशात ई फार्मसी योजना कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस असून राज्यातील औषध विक्रेते आंदोलनात्मक भूमिकेत आहेत. त्याचा एक भाग म्हणून १४ आॅक्टोबरला एक दिवसीय बंद पाळण्यात आला आहे, असे अखिल भारतीय संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या अनुषंगाने रायगडातील १२०० हून अधिक दुकानांचे शटर डाऊन झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या औषधांची विक्री थांबली होती. (वार्ताहर)
>आॅनलाईन व्यवसाय पूर्णपणे अवैध असल्याने या व्यापारास बंदी घालावी. डुप्लीकेट औषधांचा शिरकाव, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक, वेदनाशामक व अन्य प्रकारच्या औषधांना चालना आदी धोकादायक गोष्टीची जाणीव शासनाला करून देत आॅनलाईन फार्मसीचे धोका लक्षात आणून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केले
आहे.
> बंदसाठी शासनातर्फे सर्व तयारी केली होती. एकाही रुग्णास औषधापासून वंचित ठेवले नाही. आॅनलाइन फार्मसी हा केंद्राचा विषय आहे. याबाबतचा कायदा अजून व्हायचा आहे. मात्र विक्रेत्यांच्या बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. पनवेलमध्ये औषधांची दुकाने उघडी आहेत असे साळुंखे यांनी भेटीअंती सांगितले. मात्र संघटनेचे विक्रेत्यांनी शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले आहे.
- साहेबराव साळुंखे, सहायक आयुक्त, अन्न व औषध विभाग, पेण