शेकडो एकर जमिनीचा घोटाळा
By Admin | Published: February 7, 2016 12:25 AM2016-02-07T00:25:36+5:302016-02-07T00:25:36+5:30
तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करून जमिनींची खरेदी-विक्री केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून, वाळण विभागातील पाने गावाजवळील शेकडो एकर जमिनींचा
- संदीप जाधव , महाड
तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करून जमिनींची खरेदी-विक्री केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून, वाळण विभागातील पाने गावाजवळील शेकडो एकर जमिनींचा बनावट दस्तावेजाद्वारे गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांची या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
गेल्या महिन्यात या गैरव्यवहार प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले होते. स्थानिक दलालांसह एकूण १० जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी यापैकी कोणालाही अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मे २०१४ ते जून २०१५ दरम्यानच्या काळात तालुक्यातील पाने येथील सहदेव बाबाजी दानावले (७०), तुकाराम धोंडू करोजे (६५), राजाराम नथुराम शिंदे (६५), रामदास भानुराव कनोजे (६०) या शेतकऱ्यांच्या मालकीची शेतजमीन बनावट ओळखपत्रांसह अखत्यारपत्र तसेच बनावट दस्तऐवजाच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री केल्याची बाब या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. दुय्यम निबंधक महाड व माणगाव येथे या जमिनींची दस्त नोंदणी झाल्याचे उघडकीस आले.
फसवणुकीप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालयाने ग्रामीण पोलिसांना
दिले.
पाने गावातील या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असले तरी या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मात्र मोकाटच असल्याचे समजते आहे. पोलीस निरीक्षक ए.बी. पाटील हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
न्यायालयाच्या आदेशाने १० जणांवर गुन्हे
बबन धोंडीबा मोहिते, रावजी धोंड सालेकर, तुकाराम गंगाराम पवार (पंदेरी), रमेश परशुराम कालगुडे (केतकी कोंड वाळण), विष्णू गंगाराम शेलार, नामदेव किसन नवगणे, प्रवीण वसंत ठाणेदार, विजय अनंतराव दिघे, दिलास भिवाजी कोतवाल (सर्व रा. पुणे), लक्ष्मण बाजीराव निंभोरे (पुणे) या १० जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे.