वादळामुळे दिघी किनाऱ्यावर शेकडो नौका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:05 AM2019-09-22T00:05:41+5:302019-09-22T00:05:58+5:30
हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा; खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या बोटी भरकटल्या
- गणेश प्रभाळे
दिघी : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेला पाऊस सप्टेंबर महिना अर्धाअधिक संपत आला तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसभरात व सायंकाळच्या सुमारास वर्दी देणाºया परतीच्या पावसाचे आता हवामान खात्याकडून वादळी पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छीमारांनी शुक्रवारी सायंकाळी वादळापासून सुरक्षिततेसाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या खाडीत आश्रय घेतला आहे. यावेळच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
तालुक्यात गेला आठवडाभर पावसाचा पत्ता नव्हता. पाऊस गेला अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. यावेळी गणेशोत्सवात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना गणेशोत्सवानंतर कोळी बांधवांची मासेमारीसाठी काही दिवसांची सुरुवात झाली असतानाच शुक्रवारपासून अद्यापपर्यंत ढगाळ वातावरणात पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील जीवना बंदर, भरडखोल, आदगाव तसेच दिघी बंदरातील मासेमारी कमी प्रमाणात होत असल्याने कोळी बांधवांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तालुक्यातील स्थानिक मासेमार सांगतात. दहा दिवसांच्या कालावधीत रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका समुद्रात होत्या. दोन दिवसांपासून वादळी वाºयाने थैमान घातल्याने यामधील सहाशेहून अधिक नौकांनी दिघीबंदर किनाºयावर आश्रय घेतला आहे.
आगरदांडा बंदरात ३५० बोटी दाखल
मच्छीमारांचे नुकसान; गुजरातमधील होड्यांची संख्या अधिक
आगरदांडा : सप्टेंबर महिन्याच्या २ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बदलामुळे कधी जोरदार वाºयाचा मारा तर कधी मुसळधार पावसामुळे समुद्रकिनारी राहणाºया लोकांचे जीवन अधिक धोकादायक बनले. संपूर्ण कोकणात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया कोळी समाजावर मोठे संकट कोसळून त्यांची परिस्थिती अधिक दोलायमान बनली आहे. हे हवामान सोमवार २३ सप्टेंबरपर्यंत सुरळीत होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परंतु सध्या जोरदार वारे व पावसामुळे गुजरातमधील सर्वाधिक होड्या आगरदांडा व दिघी समुद्रकिनारी नांगरून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर या बंदरात रत्नागिरी, पालघर व गोवा राज्यातील होड्या सुद्धा शाकारण्यात आलेल्या आहेत.
आगरदांडा बंदरात सर्वाधिक बोटी नांगरून ठेवल्याआहेत. यावेळी गुजरातमधील काही बोट मालकांशी संपर्क करून या बंदरात आपणास प्रशासनाची मदत मिळते का ? असा प्रश्न विचारताच त्यांनी बोट तपासणी करण्याच्या नावाने अधिकारी येतात, विविध कागदपत्रे तपासतात जर एखादा कागद नसेल तर आम्ही बोट मालकाशी संपर्क करून हा दस्तावेज देतो असे सांगताच आम्हाला जाणूनबुजून येथील अधिकारी वर्ग हे दस्तावेज चालणार नाही असे सांगून दंड आकारत आहेत असे सांगितले. या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून आमच्या बोटी उभ्या आहेत, पण आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे यावेळी सांगितले.
आगरदांडा बंदरात गुजरात-गोवा आदी ठिकाणहून सुमारे तीनशेपेक्षा जास्त बोटी आसरा घेण्यासाठी थांबल्या आहेत. त्याचप्रमाणे रेवदंडा व रेवस खाडीत सुद्धा असंख्य बोटी स्थिरावल्या आहेत. मत्स्य विभागामार्फत आम्ही मच्छीमार सोसायट्यांना आदेश दिले आहेत की, खराब हवामानामुळे ज्या बोटी किनाºयावर उभ्या आहेत त्यांना औषध, पाणी व तत्सम मदत करावी. त्याचप्रमाणे अशा बोटीवरील व्यक्तींना लागणारी अन्न व पाणीपुरवठा करण्याची सुविधा त्यांना देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. आमचा कोणताही अधिकारी कोणालाही त्रास देत नाही. खराब हवामान कधी सुरळीत होईल याबाबतच्या कोणत्याही सूचना हवामान खात्याकडून आम्हाला मिळाल्या नाहीत.
- सुरेंद्र गावडे, मत्स्य व्यवसाय अधिकारी
खराब हवामानामुळे बाहेर राज्यातील बोटींना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठ गाठण्यासाठी आॅटो रिक्षा अथवा टेम्पोसाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातील माणसांवर खर्च वाढला आहे. यासाठी हवामान लवकर सुरळीत होऊन आम्हाला आमच्या राज्यात सुखरूप जाऊदे अशी प्रार्थना करताना येथील बोट मालक दिसत आहेत. हवामानाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसला त्याचप्रमाणे सर्वाधिक मच्छीमारांना बसून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होताना दिसत आहे.