रासायनिक पाण्याच्या फुटलेल्या वाहिनीने शेकडो मासे मृत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पितळ उघडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 05:16 PM2017-09-08T17:16:05+5:302017-09-08T17:16:12+5:30
मजकूर गावानजीक असलेल्या नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायनिक पाणी मिसळल्याने शेकडो मासे व जलचर प्राणी मृत झालेले आहेत. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणा-यांवर उपासमारी ओढावलेली आहे.
शैलेश चव्हाण
तळोजा, दि. 8 - मजकूर गावानजीक असलेल्या नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायनिक पाणी मिसळल्याने शेकडो मासे व जलचर प्राणी मृत झालेले आहेत. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणा-यांवर उपासमारी ओढावलेली आहे. तळोजात प्रदूषणाच्या वारंवार घटना घडत असतात, मात्र याबाबत प्रदूषण मंडळ कानाडोळा करून आपली वेळ मारून नेत आहे.
तळोजातील एम ब्लोक या ठिकाणी असणा-या मच्छी कंपन्यांतून वाहणारी रासायनिक पाण्याची वाहिनी तळोजा येथील जलशुद़्धी केंद्रात येते. मात्र तळोजा मजकूर या ठिकाणी असलेल्या नदीच्या पात्रात हे रासायनिक पाणी मिसळल्याने असंख्य मासे मृत झाले आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणी माहिती मिळताच नगरसेवक हरेश केणी व अरविंद म्हात्रे यांनी कोळी बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
प्रत्येक कारखान्यांनी आपल्या कंपन्यांतील पाणी प्रकिया केंद्रात पाठवताना ते सर्वप्रथम कंपनीतच असलेल्या प्रक्रिया केंद्रात शुद्ध करून सिईटीपीकडे पाठवायला हवे, मात्र तस न करता हे पाणी तसेच एमआयडीसीच्या वाहिन्यांमार्फत सोडले जाते हे आज फुटलेल्या वाहिन्यांमुळे सिद्ध झाले आहे.
तर मासे वाचले असते
तळोजातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी एमआयडीसीची वाहिनी फुटली खरी, मात्र या वाहिनीतून घातक रसायनिक पाणी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया न करता वाहत असल्यानेच हे मासे मृत झाल्याचे समोर आलेले आहे. प्रदूषण मंडळाने नेहमीप्रमाणे घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र कारखान्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा त्रास वारंवार होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ एमआयडीसीकडे बोट दाखवत आहे .
प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या ठिकाणी जाऊन पाण्याचे नमुने घतलेले आहेत. लवकरच रिपोर्ट येतील, मात्र या फुटलेल्या वाहिनीतून वाहणारे पाणी विषारी होते का व याला जबाबदार कोण हे आता सांगता येणार नाही .
प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी
जयवंत हजारे
वारंवार नदीच्या पात्रात विशारी रसाायन मिसळण्याचे काम सुरु आहे कासाडी नदी नंतर आता तळोजातील ईतर नद्या दुषीत करण्याचा हा कट असुन प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र वेळ मारून नेत आहे. आज मृत झालेल्या माश्यांच्या नुकसानाची भरपाई प्रदूषण नियंत्रण मंडळांनी कोळी बांधवांना द्यावी व संबंधित कारखान्यांवर कठोर कार्यवाही करावी .
नगरसेवक अरविंद म्हात्रे
एमआयडीसीच्या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, लवकरच वाहिनी पूर्ववत होईल
संतोष कळसकर. तळोजा एम आय डीसी उपकार्यकारी अभियंता