शेकडो मासेमार बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:29 PM2020-06-02T23:29:02+5:302020-06-02T23:29:13+5:30

उरणमध्ये एनडीआरएफची दोन पथके दाखल : मासेमारीसाठी गेलेल्या ८ ते १० बोटींना तडाखा बसण्याची शक्यता

Hundreds of fishing boats moved to safety | शेकडो मासेमार बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या

शेकडो मासेमार बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असतानाच रायगडात ‘निसर्ग’ चक्रीवादळ दाखल होण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर उरण परिसरातील किनारपट्टीवरील अनेक गावांमधील नागरिक, मच्छीमारांची घबराट पसरली. शेकडो मच्छीमारांनी बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किनारपट्टीवरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


उरणमधून पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली असतानाही काही मच्छीमार बोटी अवैधरित्या खोल समुद्रात गेल्याचे सांगितले जात आहे. अशा ८ ते १० बोटी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.


बुधवारी अरबी समुद्रमार्गे रायगडसह मुंबई समुद्र किनाºयाला चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वादळ जवळपास १४० किमी ताशी वेगाने किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे उरण परिसरातील किनारपट्टीवरील घारापुरी, मोरा, हनुमान कोळीवाडा, केगाव, पीरवाडी-नागाव, पाणजे, करंजा, खोपटा, वशेणी खाडी, बोरखार, न्हावा, न्हावा- खाडी, गव्हाण, कोपर, बेलपाडा आदी गावांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनानेही खबरदारीची उपाययोजना म्हणून किनारपट्टीवरील गावांना, मच्छीमारांना दवंडी पिटत सतर्क राहाण्याच्या इशारा दिला आहे.


उरण परिसरात मोरा, हनुमान कोळीवाडा, करंजा, खोपटा, गव्हाण आदी गावांमध्ये सुमारे एक हजार मच्छीमारी बोटी आहेत. कोरोना त्यानंतर पावसाळी मासेमारी बंदीनंतर हजारो मच्छीमार बोटी परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या विविध बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या इशाºयानंतर मच्छीमारांकडून हजारो बोटी करंजा, मोरा बंदरातील सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र नाखवा यांनी दिली.


तसेच संस्थेच्या सभासदांपैकी एकही मच्छीमार बोट अवैधरित्या मासेमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली नसल्याची माहितीही नाखवा यांनी दिली. मात्र पावसाळी मासेमारी बंदीनंतरही उरण परिसरातील सुमारे १५ ते २० बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बोटी मासेमारी करून परतलेल्या आहेत. मात्र ८ ते १० बोटी परतल्या नाहीत. त्यामुळे त्या वादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे..

चक्रीवादळाच्या इशाºयानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून केगाव- दांडा, करंजा, मोरा येथील सुमारे ३० ते ३५ कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. तसेच उरणकरांंच्या नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके उरणमध्ये दाखल होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळी मासेमारी बंदी असल्याने १ जूनपासून उरण परिसरातून एकही मच्छीमार बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नाही. मात्र अवैधरित्या मासेमारीसाठी बोटी गेल्या आहेत की नाही याचीही चौकशी करण्यात येत आहे.
- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

Web Title: Hundreds of fishing boats moved to safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.