माणुसकीचे अतुलनीय दर्शन : मदतीसाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:26 AM2019-07-29T01:26:14+5:302019-07-29T01:26:45+5:30

माणुसकीचे अतुलनीय दर्शन : पुरात अडकलेल्यांची सुखरूप सुटका

Hundreds of hands rushed to help in rain | माणुसकीचे अतुलनीय दर्शन : मदतीसाठी सरसावले शेकडो हात

माणुसकीचे अतुलनीय दर्शन : मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Next

कांता हाबळे 

नेरळ : गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेकडो लोक अडकून पडले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोलमडून पडल्याने आता करायचं काय असा प्रश्न या पूर सदृश्य परिस्थितीत अडकून पडलेल्या नागरिकांना पडलेला असताना त्यांच्यासाठी असंख्य हात सरसावले आहेत. जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध झाल्याने या सगळ्यातून माणुसकीचे अतुलनीय दर्शन घडले आहे.

२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर २६ जुलै ही तारीख महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात धडकी भरावणारी ठरली. यावर्षीही असाच २६ जुलै शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने प्रत्येकाच्या मनात धडकी भरवली; आणि ज्याची भीती होती तेच झाले. शुक्रवार सायंकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाहता-पाहता रस्त्यात पाणी साठायला लागले तर रेल्वे रुळांवरही पाणी भरले. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि त्याबरोबर प्रमुख राज्य मार्ग व महामार्गही ठप्प झाले. या सगळ्यात प्रवास करणारे प्रवासी नागरिक अडकून पडले. शुक्रवारी सुरू झालेला पाऊस शनिवारी सायंकाळपर्यंत मुसळधार सुरूच राहिल्याने अडकून पडलेल्या नागरिकांसाठी सर्व स्तरातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले.
नेरळ रेल्वे स्थानकात व परिसरात अडकलेल्या नागरिकांसाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंके व उपसरपंच अंकुश शेळके यांनी ग्रामपंचायतीची दालने मोकळी केली. त्यांची ग्रामपंचायतीत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तर नेरळमधील आगरी समाज संस्थेने हुतात्मा हिराजी पाटील सभागृह नागरिकांसाठी उघडे केले, त्याठिकाणीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कर्जत जैन बांधव संघटनेतर्फे असिफ मिर्झा, गिरीश कांबळे व रोटरी क्लब कर्जतचे कार्येकर्ते यांच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या मेल गाड्यांमधील प्रवाशांना जेवण, नाष्टा, चहा, बिस्कीट देण्यात आली. कर्जत शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिक व प्रवाशांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन येथे व्यवस्था करण्यात आली होती. तर कोंढाणा ग्रुप या सोशल मीडिया ग्रुपचे अडमिन व सदस्य यांनीही प्रवाशाची आस्थेने विचारपूस करून बिस्कीट, पाणी व जेवणाची व्यवस्था केली.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जण अडकून पडले होते. काहींच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे असल्याने या आपत्तीत मदतीसाठी अनेक हात सरसावले. या कार्यात अनेक संस्था व व्यक्ती सारसावल्याने सर्व स्तरातून या माणुसकीचे दर्शन घडले.
 

Web Title: Hundreds of hands rushed to help in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.