माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मुंबई-गोवा मार्ग असो, पेण-पनवेल मार्ग असो, पाली-खोपोली मार्ग असो अथवा भविष्यातील निजामपूर-पुणे मार्ग असो रुंदीकरण व चौपदरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. तसेच निसर्गसंपन्न कोकणचे वैभवही नष्ट होत आहे.तीन-चार वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा मोठमोठे वृक्ष दिसायचे. मात्र, चौपदरीकरणाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. महामार्गावरील दुभाजकामध्ये येणारी झाडे वाचविणे संबंधित प्रशासनाला सहज शक्य होते. मात्र, तसे झालेले नाही. महामार्गाचे काम पूर्ण होताच शासनाच्या वतीने दुभाजकामध्ये वृक्षलागवड करण्यात येईल. मात्र, ती झाडे शोभेची असतील,आणि त्यांची उंची फार फार तर १० फुटांपर्यंत असेल.गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या तापमानात मोठा बदल झाला आहे. वृक्षतोड, पर्यावरणाचा ºहास हे हवामान बदलाचे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे जुने, महाकाय वृक्ष तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करावे, आणि रुंदीकरणामुळे जेवढी झाडे तोडण्यात येत आहेत, त्याच्या दुप्पट वृक्षारोपण व संवर्धन व्हायला हवे, असे पर्यावरणपे्रमींचे म्हणणे आहे.
चौपदरीकरणात शेकडो वृक्षांचा बळी, पुनर्रोपणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 3:00 AM