म्हसळा : निसर्ग चक्रीवादळातून विजेचे वीजप्रवाह खांबसुद्धा सुटले नाहीत. यामुळे सगळीकडे अंधार पडला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण कार्यकारी अभियंता रघुनाथ माने, सहा.अभियंता खांडेकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत होईल, असे प्रयत्न केले आहेत, पण कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.तालुका शहरे वगळली, तर गेली महिनाभरात शेकड्यांनी गावे अंधारात आहेत. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे काम आणि सांगण्यात येत असलेली कारणे अशीच सुरू राहिले, तर खेडेगावात महिना दोन महिने नव्हे, वर्ष, दोन वर्षे वीजपुरवठा खंडित राहील, असे वीज वितरण कंपनीतल कर्मचारी लोकांना सांगत आहेत.शासन स्तरावर वीजपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. मुख्यकरून ताप, सर्दी, खोकल्याची साथ आणि कोरोनाची भीती असे असताना, वैद्यकीय गरज लागली, तर सेवा मिळवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने फोन चार्ज होत नाहीत, नळपाणीपुरवठा योजनेला पाणी येत नाही. गावांमध्ये नेटवर्क नसल्याने डॉक्टर, नर्स कोणालाही फोन करता येत नसल्याचे चित्र आहे. केवळ शहरी भागातील काही ठिकाणी विजेचा पुरवठा झाल्यानंतर, खेडेगावातही उशिरा का होईना, विजेची व्यवस्था व्हायला पाहिजे आहे, ती महिना उलटला तरी होताना दिसत नाही. अखेरीस कंटाळून अनेक गावांतील चाकरमानी कुटुंबे बायका-मुले घेऊन परत मुंबई, पुणे आधी शहरात निघून गेले आहेत.१२ जुलैपर्यंत हीच स्थितीवादळामुळे तब्बल १५ हजार विजेचे खांब पडले होते. विजेच्या तारा, वीज जनित्रे यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. सुरुवातीला तब्बल १,९०६ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, महावितरणने युद्ध पातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप माणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणेचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याने अद्यापही गावे अंधारामध्ये चाचपडत आहेत.
श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शेकडो गावे अजूनही अंधारात, काम थंडावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:30 AM