उरण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याच्या साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेल्या परवानगीला पुन्हा तीन दिवसांतच स्थगिती दिली आहे. यामुळे उरण परिसरातील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट येऊन ठेपले आहे.
स्थगिती उठविण्यात राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मच्छीमार संस्था आणि परिसरातील मच्छीमारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आणि होणारी गर्दी रोखण्यासाठी विशेष बाब म्हणून उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्यासाठी करंजा मच्छीमार संस्थेने परवानगी मागितली होती. रायगडचे साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त एस.आर. भारती यांनीही संस्थेच्या मागणीनंतर १०० मच्छीमार बोटींसाठी २१ सप्टेंबर रोजी काही अटीशर्तीवर तत्काळ परवानगी दिली. साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेली परवानगी बेकायदा आहे. त्यामुळे परिसरातील मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच परवानगीमुळे करंजा बंदरात करंजाबाहेरील बोटी येत असल्याने सुरू करण्यात आलेला अनधिकृत बाजार बंद करण्याची तक्रार भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त भारती यांनी तीन दिवसांपूर्वी करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्यासाठी दिलेल्या परवानगीला स्थगिती दिली आहे. उरण पोलिसांनीही कारवाई करत बंदरातील मासळी बाजार बंद केला आहे.स्थगिती उठवून मच्छीमारांना करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची भेट घेतली होती. तर काही राजकीय पक्षांचे पुढारी व संस्थांच्या पदाधिकाºयांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन मच्छीमारांच्या व्यथा मांडल्या होत्या. तसेच शेकाप आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनीही रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना संयुक्त पत्र लिहून प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. सर्व मंत्र्यांनीही करंजा येथील मच्छीमारांसाठी विशेष बाब म्हणून स्थगिती उठवून सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे हे चालढकल करीत असल्याचा आरोप मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाºयांकडून केला जात आहे.साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनीच दिलेल्या परवानगीला पुन्हा तीन दिवसांतच स्थगिती दिली. यामुळे परिसरातील शेकडो स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. प्रश्न सुटावा यासाठी मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. मात्र मागील आठ दिवसांपासून आयुक्त चालढकलपणा करीत आहेत.- भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्थाराज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे हे भाजपच्याच दबावाखाली येऊन काम करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांच्या अनेक समस्या आणखी जटिल करण्यावरच त्यांचा अधिक भर आहे.- मार्तंड नाखवा, सदस्य, महाराष्ट्र मच्छीमार महासंघ