पारंपरिक वाळू व्यावसायिकांवर उपासमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:58 PM2021-01-01T23:58:40+5:302021-01-01T23:58:50+5:30
सावित्री नदीमध्ये खाडीचा काही भाग असल्याने सावित्री नदीला खाडीचे स्वरूप आले आहे.
दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री नदी पात्रात गेली अनेक वर्षे वाळू व्यवसाय सुरू आहे. यामध्ये दासगावमधील भोई समाज बुडी मारून वाळू काढण्यात तरबेज आहेत. मात्र, गेली काही वर्षांपासून शासनाने अव्वाच्या सवा रॉयल्टी सुरू केल्याने पारंपरिक वाळू व्यावसायिकाला निविदा भरणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत दासगावमधील पारंपरिक वाळू व्यवसायिक दिलीप उकिर्डे यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
सावित्री नदीमध्ये खाडीचा काही भाग असल्याने सावित्री नदीला खाडीचे स्वरूप आले आहे. या खाडीमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी खाडीलगत सोडण्यास सुरुवात झाली आणि सावित्री नदीचे पाणी प्रदूषित झाले. यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आणि वाळू व्यवसायाकडे स्थानिक ग्रामस्थांनी कल वळविला.
वाळू उद्योगातील व्याप्ती पाहता, यामध्ये भांडवलदारांचा शिरकाव झाला आणि शासनानेही महसूल वाढवण्यासाठी याच प्रक्रियेला पाठबळ दिले. या प्रक्रियेत स्थानिक वाळू व्यावसायिक तग धरू शकला नाही, याचा फायदा अन्य व्यावसायिकांनी घेत वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी शासकीय नियमांचे उल्लंघन करत, संक्शन पंप आणि प्रमाणापेक्षा होड्या खाडीत सोडून वाळू उपसा सुरू केला गेला. शासनाने स्थानिक वाळू व्यावसायिकांसाठी हातपाटीने उपसा करण्याचा परवाना देण्याचे धोरण सुरू केले.