श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, भरडखोल, दांडगुरी या परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. वादळामुळे दिवेआगर येथे नारळ व सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने प्रचंड नुकसान झाले तर पर्यटनासाठी आलेल्या पुणे मुंबई येथील पर्यटकांच्या चारचाकी वाहनांवर नारळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बोर्लीपंचतन येथील एसटी स्टॅण्डजवळील रोहिदास नगरमध्ये जुनाट आंब्याचे झाड कोसळले तर काही ठिकाणी घरांच्या छपरांचेही मोठे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. दिवेआगर येथे ९ घरांचे तर भरडखोल येथे २ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रु पयांचे नुकसान या वादळाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. वाºयाच्या प्रचंड वेगामुळे शेखाडी येथे श्रीवर्धन - बोर्ली मार्गावर मोठमोठी सुरूची झाडे उन्मळून पडल्याने सकाळी १० वाजेपर्यंत येथील वाहतूक पूर्णत: ठप्प होती, यामुळे वाहतूक दांडगुरी मार्गावरून चालू होती. वादळी वाºयामुळे समुद्रकिनारी असलेल्या सुवर्ण गणेश नगरीमध्ये म्हणजेच दिवेआगर येथे नारळ सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. यामध्ये सलग तीन दिवस सुट्टी असल्याने दिवेआगरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. यातच समर्थनगर येथील कोको हट रिसॉर्ट येथे पर्यटकांच्या गाडीवरच नारळाचे झाड पडल्याने तीन गाड्यांचे नुकसान झाले. यामध्ये मुंबई येथून आलेल्या मोगसीन शेख यांच्या चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नवी मुंबई येथील योगेश शेजुळ यांच्या व पुणे येथून आलेल्या स्वप्निल पंडित यांच्या गाड्यांचेही नुकसान झाले.दिवेआगर येथील भट्टी विभाग येथील सुरेश शितप, बांद्रे, तळाणी विभाग येथील बाळाराम वाणी यांच्या घरांचे नुकसान झाले, तर नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून लवकरच मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. तर मध्यरात्रीच्या या वादळीवाºयामुळे वीजतारांवर झाडे पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वितरणाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असून रात्रीपर्यंत तरी सर्व गावांतील वीजपुरवठा सुरू होण्यास वेळ लागेल असे सांगितले.
श्रीवर्धन तालुक्याला वादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:03 AM