- जयंत धुळप, लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : शुक्रवारी संध्याकाळी 6.3० वाजल्या पासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अलिबाग शहर व परिसरात झालेल्या चक्रीवादळात लोकमत कार्यालयाजवळचा विजेचा खांब कोसळला. त्यावेळी दोन मोटरसायकल स्वार रस्त्यावरुन जात होते. त्यांनी लागलीच मोटरसायकल सोडून बाजुला पळाल्याने बचावले.
विजेचा खांब पडल्याबाबत विज वितरण कंपनीच्या कार्यालयात फोन केला असता, पाऊस थांबल्यावर लाईनमन येतील, असे उत्तर दिले. दरम्यान, उपस्थित नागरिकांनी तिन्हा बाजूने येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपण थांबवण्यात आली. संपूर्ण शहरातील विज पूरवठा बंद झाला असून तो पूर्ववत सुरु होण्याकरिता सकाळ उजाडणार आहे.
पेण तालुक्यात कने , तामसी बंदर , वरेडी येथे घरांचे पत्रे उडाले आहेत. तसेच पेण येथे सागर सोसायटीत घरावर आंब्याचे झाड पडले आहे. जीवित हानीचे वृत्त नाही. दरम्यान, वादळामुळे मांगरुळ-कामार्ली दरम्यान चिंचेचे मोठे झाड पडल्यामुळे पेण खोपोली मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सा . बां . विभागामार्फत झाडे हटविण्याचे काम सुरू झाले असून एका बाजूने वाहतूक सुरु केली आहे.
मांडवा अलिबाग र स्त्यावर झाडे पडली आहेत. साबांवि पथक रवाना. पेझारी येथील सरस्वती कुंज शिक्षक सोसायटीचे टेरेस वरील पत्रे उडून व पाण्याच्या टाक्या पडुन टेरेसचे आतोनात नुकसान झाले आहे.