कर्जत मतदारसंघाचीही मी लेक; अदिती तटकरे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:39 AM2020-01-02T00:39:54+5:302020-01-02T00:40:05+5:30
कर्जतमध्ये कार्यकर्त्यांशी साधला संवाद
कर्जत : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष आणि समविचारी पक्षाच्या महाआघाडीला रायगड जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. मला राज्यमंत्रिपद आपल्या सर्वांच्या सदिच्छेने मिळाले. मी श्रीवर्धन मतदारसंघात मते मागताना श्रीवर्धनची लेक आहे म्हणून मते मागितली. त्याचप्रमाणे मी आता कर्जत मतदारसंघाचीही लेक आहे. कोणत्याही कामासाठी मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. असा शब्द नवनिर्वाचित राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी येथे दिला.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कर्जत मतदारसंघातील माजी आमदार सुरेश लाड यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी अदिती तटकरे कर्जतमध्ये आल्या होत्या. या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्या राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या होत्या. अदिती तटकरे यांनी पुढे बोलताना, मला मार्गदर्शन करायला बाबा असले तरी त्यांच्याशी बोलताना मला कधी कधी मर्यादा असतात; पण सुरेश लाड यांच्याशी मनमोकळे बोलणे होते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल. ते सभागृहात आल्यास मला आनंदच होईल, असे स्पष्ट करून मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करीन.
जिल्हा परिषद अध्यक्ष असताना निधीबाबत थोडे डावे उजवे झाले असेल; पण आता ती वेळ येणार नाही, असे स्पष्ट केले. सुरेश लाड यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, हनुमंत पिंगळे, परिषद सभापती नरेश पाटील, उमा मुंढे, जिल्हापरिषद सदस्य सुधाकर घारे, एकनाथ धुळे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.