"अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 11:13 PM2023-08-27T23:13:54+5:302023-08-27T23:21:49+5:30

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे

I can also give a return gift of underwear; Raj Thackeray's direct warning to the government | "अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

"अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

googlenewsNext

मुंबई/रायगड - मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. कोकणातील जनतेलाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. यावेळी, आंदोलक मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसेच, मी रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असे म्हणत राज यांनी थेट इशाराही दिला.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. राज ठाकरेंनी जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हटले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे.  खरंतर मी पण पदयात्रेत सहभागी झालो असतो, पण काही महिन्यांपूर्वी माझं ऑपरेशन झालं त्यामुळे इतकं चालण्याची मला अजून परवानगी नाही. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून सांगायचं आहेच, असे म्हणत राज यांनी सरकारला थेट इशारा दिला. यावेळी, मुंबई-गोवा रस्त्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याचा संताप व्यक्त केला.

''परवा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, पोलीस स्टेशनमध्ये सरकारने अंडरवेअरवर बसवलं, ह्या सरकारला मला एकच सांगायचं आहे ते मग आधीचं असो की आत्ताच, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो, अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो'', अशा शब्दात राज यांनी सरकारला इशाराच दिला आहे. 

कोकणी बांधव शांत कसा राहू शकतो?

गेली १७ वर्ष हा मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. ह्या काळात ह्या रस्त्यावर २५०० माणसं गेली, गाड्यांचं किती नुकसान झालं असेल त्याची मोजदादच नाही. दरवेळेला खड्डे भरून सगळ्या सरकारांनी वेळ मारून नेली आहे. इथे येताना तर मी एक अजबच प्रकार पाहिला तो म्हणजे ह्या महामार्गावर मध्येच पेव्हरब्लॉक टाकलेत. अहो जगात सर्वत्र रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतात आणि फुटपाथ पेव्हरब्लॉकचे. इथे सगळं उलटंच. आणि असं तुमच्या आयुष्याशी खेळून पण कोकणी बांधवाला काही वाटत नाही, तो शांत कसा राहू शकतो ? त्याच त्याच लोकांना कसं निवडून देऊ शकतो हे मला कळत नाही. 

दबाव आणला तरी जमिनी विकू नका

राज्यातील एक महामार्ग १७ वर्ष का रखडतो? ह्या मागे मला एक षडयंत्र जाणवतंय. आज कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या आणि पुढे रस्ता चांगला झाला की अव्वाच्या सव्वा भावाने व्यापाऱ्यांना विकायच्या. आणि हे आपलीच लोकं करत आहे. कुंपणच शेत खात असेल तर करायचं काय ? माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका. कितीही आमिषं दाखवली, कितीही दबाव आणला तरी विकू नका. बाकी ह्या व्यापाऱ्यांचे काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तुम्ही जमीन सोडू नका म्हणजे झालं, असं आवाहनही राज यांनी कोकणवासीयांना केलंय.  

Web Title: I can also give a return gift of underwear; Raj Thackeray's direct warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.