महाड : ‘शासन आपल्या दारी’ या महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी होत आहे. मात्र, दुसरीकडे महाड तालुक्यातील एका अंध व्यक्तीची पत्नी आपला पती अंध असल्याचा दाखला मिळण्यासाठी शासनदरबारी वणवण भटकत आहे. प्रशासकीय अधिकारी मात्र त्या महिलेला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे या महिलेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाड तालुक्यातील ७५ वर्षे वयाचे नामदेव भिकू पवार (रा. माझेरी) असून ते मागील तीस वर्षांपासून अंध आहेत. त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. अंध असल्याचा पुरावा म्हणून शासन दरबारी दाखला मिळण्यासाठी त्यांची पत्नी वैजंता नामदेव पवार या शासनाचे उंबरठे झिजवत आहे. सरकारी अधिकारी तिला कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर देत नाहीत. एका दाखल्यासाठी महाड ते माझेरी हा २० किलोमीटरचा प्रवास त्यांना वारंवार करावा लावत आहेत. या कटकटीला कंटाळून अखेर ‘आता मला दाखला नको’, अशी खंत या त्यांनी बोलून दाखवली.
माझेरी ते महाड, महाड ते माणगाव आणि महाड ते अलिबाग असे वणवण भटकावे लागत असून, अजून मी शासन दरबारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या किती पायऱ्या झिजवाव्यात. आमची ही परवड शासनापर्यंत पोहोचवावी. मला अक्षरक्ष: वीट आला आहे. आता मला दाखला नाही, मिळाला तरी चालेल, परंतु मी दाखल्यासाठी जाणार नाही.- वैजंता नामदेव पवार
जुना दाखला असतानाही... नामदेव पवार यांच्याकडे शासनाचा जुना अपंगत्व दाखला आहे. गेली दोन वर्षांपासून हा दाखला डिजिटल स्वरुपात दिला जात आहे. शिवाय अन्य सुविधांसाठीदेखील स्वतंत्र कार्ड दिले जात आहे. या प्रत्येक दाखल्याकरिता, कार्डकरिता अनेक दाखले जोडावे लागत आहेत. हे दाखले गोळा करताना दिव्यांग व्यक्तींचे नाकीनऊ येत आहेत. आधीच दिव्यांग असल्याने त्यांना शासकीय दरबारी फेऱ्या माराव्या लागत आहेत.