महाड : चवदार तळ्याच्या १९ मार्चला करण्यात आलेल्या जलपूजनाबाबत चुकीची वृत्त पसरून बदनामी करण्यात आली. ही बदनामी म्हणजे विघ्नसंतोषी लोकांनी आपल्या विरोधात रचलेले कटकारस्थान असल्याचा आरोप आ. भरत गोगावले यांनी केला. जलपूजनाबाबत सोशल मीडियावर चुकीची वृत्त पसरवणाऱ्यांवर तसेच आंबेडकरी संघटनांच्या निषेध सभेत आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेतर्फे शिवाजी चौकात निषेध सभा घेऊन प्रत्युत्तर दिले. आ. गोगावले यांच्या समर्थनार्थ शनिवारी शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने शिवाजी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना आ. गोगावले म्हणाले की, आपण केलेले जलपूजन हे जलसंपदा विभागाच्या परिपत्रकानुसारच आहे. मात्र याबाबत प्रसारमाध्यमांनी चुकीची वृत्ते पसरवून दलित जनतेत विनाकारण आपल्या विरुद्ध गैरसमज निर्माण करून दिला. मात्र महाड मतदारसंघातील बौध्द समाज १०० टक्के आपल्याच पाठीशी आहे. दलित संघटनांचे पुढारी जलपूजनाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही आ. गोगावले यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाप्रमुख रवी मुंढे, बिपीन म्हामुणकर, सुरेश महाडीक, स्वप्नाली शिंदे, बाळ राऊळ, प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते.
चुकीचे वृत्त पसरवून माझी बदनामी केली !
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM