'मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार', उरणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमातून नव विद्यार्थी मतदारांना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:31 PM2024-04-08T18:31:14+5:302024-04-08T18:31:33+5:30
जासई येथील राजिपच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा.कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा.
मधुकर ठाकूर -
उरण : उरण मतदार संघात लोकसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर ठिक -ठिकाणी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाद्वारे मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमात उरण शहरातील युईएस कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ' मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार अशी शपथ देण्यात आली.तसेच मतदान करताना काय करावे आणि काय करू नये या विषयावर नाट्य सादरीकरण करून प्रबोधन करण्यात आले.
जासई येथील राजिपच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा.कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. मतदान का करावे याबाबत स्विप पथकाचे रुपेश पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी किशोर पाटील यांच्या पथकाने पथनाट्यही सादर केले.या आयोजित जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी जासई विभागातील सर्व महिला बचतगट, पालक व सुमारे ३०० नागरिक सहभागी झाले होते.
विंधणे येथील कातकरी वाडीत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.याशिवाय महिला मेळावा ,पालक सभा ,पालकांना संदेश पत्राचे वाटप असे विविध उपक्रम राबवून आदिवासींमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसिलदार डॉ.उद्धव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ठिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती अंतर्गत अभियानात उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर, गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे,चिरनेर केंद्रप्रमुख नरेश मोकाशी,रुपेश पाटील आदी अधिकारी सहभागी झाले होते.