दासगावमधील इब्राहिम यांनी जपली बाज विणण्याची कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:00 AM2020-02-05T00:00:03+5:302020-02-05T00:00:41+5:30
ग्रामीण भागात आजही झोपणे, बसण्यासाठी वापर
- सिकंदर अनवारे
दासगाव : ग्रामीण भागात ज्या काळात आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्या काळात पारंपरिक वस्तू, साहित्य आणि लाकडी सामान वापरून जीवनाचा आनंद घेतला जाई. आज आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने या कला लोप पावत असल्या तरी दासगावमधील इब्राहिम कारवीनकर यांनी बाज विणण्याची कला मात्र जपून ठेवली आहे. त्यांनी विणलेल्या बाजेला आजही मागणी आहे.
गेल्या अनेक पिढ्यांपासून ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने निर्माण केलेली साधने वापरून जीवनाचा आनंद घेतला जाई. बदलत्या काळात अनेक शोध लागत गेले आणि लाकडाची जागा प्लास्टिक, लोखंड आदी धातूंनी घेतली. यामुळे घरातील लागणाऱ्या वस्तू या धातूपासून सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होऊ लागल्या.
यामुळे लाकडी सामान, दगडी वस्तू दुर्मीळ होत गेल्या. असे असले तरी महाडसह अनेक ठिकाणी जुने कलाकार आजही या कला जिवंत ठेवण्यात गुंतले आहेत. यास फार मोठी मागणी नसल्याने उत्पन्नही मिळत नाही. मात्र, कला जपणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत कलेतील आनंद ते दाखवून देत आहेत. या पारंपरिक कलेमध्ये झोपण्यासाठी लागणारी बाज (खाट) विणणे हीदेखील एक कलाच आहे. ही कला जोपासली आहे दासगावमधील वय वर्षे ७० असलेल्या इब्राहिम कारवीनकर यांनी.
अनेक पिढ्यांपासून वापर
गावागावांत गेल्या अनेक पिढ्या या लाकडी खाटांचा वापर केला जात आहे. चार पायाची ही खाट दोरीच्या साहाय्याने विणली जाते.
च्सुती दोर याकरिता वापरला जातो. सुती दोर आणि लाकडी सांगाडा यातून या बाजेची निर्मिती होत असते.दासगावमधील इब्राहिम महम्मद कारवीनकर हे गेल्या ४० वर्षांपासून बाज विणण्याचे काम दासगावमध्ये करत आहेत. महिन्याला दहा ते १५ खाटा विणल्या जातात. एका विणकामासाठी पूर्वी ५० रुपयांपासून बाज विणकाम सुरू केले. सध्या मात्र ५०० रुपये आकारले जात असल्याचे कारवीनकर यांनी सांगितले.
चार इंच आणि दोन इंच अशा दोन प्रकारांत खाटा विणल्या जातात. बदलत्या काळात आता पत्रापट्टीच्या खाटा आल्या. यातदेखील बदल होत आता लाकडी बेड प्रकार आले. यामुळे बाजेला मागणी कमी होत गेली. ग्रामीण भागात आजही या बाजेला मागणी आहे.
गावागावांत या बाज आजदेखील शेतावर किंवा घराघरांत दिसून येतात. यामुळे इब्राहिम कारवीनकर यांच्याकडे महिन्याला किमान पाच तरी बाज विणकाम करण्यास येतात. यातून फार मोठी कमाई होत नसली तरी सोबतच्या व्यवसायाबरोबर बाज विनकामातून कला जोपासण्याचे काम इब्राहिम कारवीनकर करत आहेत.