निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या वातावरणात गारवा मिळवण्यासाठी नागरिक बर्फाचा गोळा, शीतपेयांना पसंती देत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिवसा शुकशुकाट दिसून येतो. मार्च महिन्याचा शेवटाचा आठवडा रायगडकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. दिवसभर वाऱ्याचा वेग काहीसा टिकून राहिल्याने दिलासा मिळाला; मात्र काही भागात वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळीही वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे. संपूर्ण आठवडाभर पारा तिशीच्या पुढेच स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी नागरिक बर्फाचा गोळा, शीतपेयांना पसंती देत आहेत. या व्यावसायिकांची त्यामुळे चलती आहे.
बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे; मात्र थंडपदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारीरिक तक्रारींना कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे....सध्या नागरिकांनी शरीरास थंडावा देणारी म्हणजेच शहाळी, कलिंगड, द्राक्ष, केळी, सीताफळ या फळांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. मात्र, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम, शीतपेय याचे सेवन टाळावे.- ज्ञानेश्वर अरसळे, वैद्यकीय अधिकारी