कर्जत : शासनाच्या डेडिकेटेड कोविड सेंटरचा दर्जा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कक्षाला देण्यात आला आहे. कोविडसाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड यांची उपलब्धता पूर्ण झाली असून, अशा आयसीयूसह व्हेंटिलेटर सेंटरचे लोकार्पण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते सोमवारी करण्यात आले.चार व्हेंटिलेटरसह आयसीयू आणि ऑक्सिजनची मध्यवर्ती सुविधा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली असून, ऑक्सिजन लिक्विड ड्युरा सेंटरही कार्यान्वित करण्यात आल्याने आता कर्जत उपजिल्हा रुग्णालयमधून एकही रुग्णाला बाहेर उपचार करण्यासाठी पाठविण्याची वेळ येऊ नये आणि यापुढे कोणत्याही रुग्णांचे आरोग्य सेवा मिळाली नाही, म्हणून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू ओढवू नये, अशी सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केली.कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सुरू केलेले कोविड सेंटरमधील ५० बेड यांच्या जोडीला व्हेंटिलेटर बेड असावेत आणि आयसीयू सेंटरची मागणी पूर्ण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या चार व्हेंटिलेटरसह आयसीयू सेंटर आणि मध्यवर्ती ऑक्सिजन, तसेच लिक्विड ऑक्सिजन ड्युरा सेंटर यांची पूर्तता झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील पहिल्या शासनाच्या आयसीयू व्हेंटिलेटरसह डेडिकेटेड कोविड सेंटरचे लोकार्पण आज २ नोव्हेंबर रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर माने, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजीव धनेगावे, डॉ. मनोज बनसोडे आदी प्रमुख उपस्थित होते.कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जत तालुक्यातील सर्व भागांतून रुग्ण येत असताना, आरोग्य विभागाच्या चुकीमुळे कोणताही रुग्ण दगवणार नाही, याचीही काळजी घेण्याची आवाहन आमदार थोरवे यांनी केले.
बाल उपचार केंद्र : डॉक्टर आणि स्टाफ यांची रिक्त पदे भरली गेली असून, आता सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन करतानाच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तत्काळ सुरू करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माने यांनी केली, तर तालुक्यातील कुपोषण शून्यावर आणण्यासाठी रुग्णालयमध्ये बाल उपचार केंद्र सुरू करण्याची सूचना केली.