तुफानाची चाहूल देणारा पक्षी ‘आडय’ची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:05 AM2018-04-27T06:05:11+5:302018-04-27T06:05:11+5:30
मच्छीमार बांधवांना समुद्री तुफानाची सूचना देणाºया सागरी जलचरांच्याही वरचे स्थान या ‘आडय’ पक्षाला आहे.
अमुलकुमार जैन ।
बोर्लीमांडला : मच्छीमारांचा समुद्रातील अत्यंत जवळचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आडय’ पक्ष्यांनी भरसमुद्रात अनपेक्षितपणे येत असलेल्या तुफानाची सूचना देत, हजारोंच्या संख्येने समुद्रातून उत्तरेच्या दिशेने स्थलांतर केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सागरी तुफानाने कोकण किनारपट्टीला धडक दिली. मात्र, तत्पूर्वी ‘आडय’ पक्ष्यांनी दिलेल्या सूचनेनुसार व त्याच दरम्यान हवामान खात्यानेही दिलेल्या इशाºयानुसार मच्छीमार बांधव किनाºयावर सुखरूप पोहोचल्याने वित्त व जीवितहानीपासून किनारपट्टी बचावल्याचे बोर्ली येथील मच्छीमार राजू शिने यांनी सांगितले.
१४ एप्रिलपासून किनारपट्टीवर धडकलेले तुफान स्थानिक मच्छीमार बांधवांना पूर्णपणे अनपेक्षित असेच होते. खोल समुद्रात मच्छीमार आपापल्या होड्या व ट्रॉलर घेऊन मच्छीमारी करीत होते. १९ एप्रिलच्या दरम्यान खोल समुद्रातील बेटांवर वास्तव्य करून असणारे ‘आडय’ नावाचे पक्षी अचानकपणे हजारोंच्या संख्येने मोठ्याने चिवचिवाट करीत अतिशय वेगाने उत्तरेच्या दिशेने प्रस्थान करताना मच्छीमारांना आढळून आले. त्यांचे हे प्रस्थान म्हणजे येणाºया तुफानाची चाहूल, हे समीकरण ठरलेलच असते. एरवी समुद्रात स्थिरावणाºया या पक्ष्यांना निसर्गातील येऊ घालणाºया घडामोडींची आगाऊ सूचना कशी मिळते कुणास ठाऊक? त्यांना ही दैवी देणगीच असते.
मच्छीमार बांधवांना समुद्री तुफानाची सूचना देणाºया सागरी जलचरांच्याही वरचे स्थान या ‘आडय’ पक्षाला आहे. हा पक्षी सागरी तुफानाची अचूक कल्पना मच्छीमार बांधवांना देतो. त्यामुळे सावध झालेले मच्छीमार ताबडतोब किनारपट्टीच्या दिशेने परतू लागतात आणि त्यामुळे जीवित आणि वित्तहानी टळते.
१९ एप्रिल रोजी या पक्ष्यांनी खोल समुद्रातील मच्छीमार बांधवांना सावध करीत किनारपट्टी सोडली. दुसºयाच दिवशी हवामान खात्याने समुद्री तुफानाचा इशारा देत, मच्छीमारांना माघारी परतण्याच्या सूचना केल्या आणि या पक्ष्यांचे आणि हवामान खात्याने दिलेले इशारे मानल्यामुळे किनारपट्टीवरील मोठा अनर्थ टळला.