किनारे स्वच्छ असतील तर पर्यटक वाढतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:55 AM2017-10-03T01:55:27+5:302017-10-03T01:55:31+5:30
महाराष्ट्रातील सागरी किनारे सुंदर व स्वछ राहण्यासाठी मंडळाकडून पुढाकार घेण्यात आला असून यासाठी काही रकमेची बक्षिसेसुद्धा ठेवण्यात आली आहेत.
नांदगाव/ मुरूड/बोर्ली-मांडला : महाराष्ट्रातील सागरी किनारे सुंदर व स्वछ राहण्यासाठी मंडळाकडून पुढाकार घेण्यात आला असून यासाठी काही रकमेची बक्षिसेसुद्धा ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी ३० लाखांपेक्षा जास्त पर्यटक फिरावयास येतात. सागरी किनारे स्वच्छ असतील तर पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे देशाला परकीय चलन मिळून देशाची आर्थिक सुबत्ता वाढणार आहे. तेव्हा समुद्रकिनारे स्वच्छ ठेवताना स्थानिक नागरिकांचे सहकार्यसुद्धा मंडळास मिळाले पाहिजे तरच ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी व्यक्त केला.
गांधी जयंतीनिमित्त या स्वछता मोहिमेचा शुभारंभ प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व महात्मा गांधी यांच्या तसबिरीला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला.
या वेळी काशीद समुद्रकिनारी जे ५० स्टॉलधारक आहेत त्यांना कचरा टाकण्यासाठी ५० कचरापेट्यांचे वाटप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कचरापेट्या निर्मल सागर तट अभियानांतर्गत मिळालेल्या निधीमधून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल सागर तट अभियानांतर्गत सागरी किनारे स्वच्छ करण्यासाठी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर हा पंधरवडा साजरा करण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी या स्वछता मोहिमेचा शेवट गांधी जयंतीनिमित्ताने करण्यात आला. स्वछता मोहिमेचा प्रसार होण्यासाठी काशीद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात
आला.
या वेळी या स्वछता मोहिमेत कोस्ट गार्ड, काशीद समुद्रकिनारी जलक्र ीडा करून पर्यटकांचे मनोरंजन करणारे सर्व कामगार तसेच मालक, शालेय विद्यार्थी, काशीद ग्रामस्थ आदींनी या स्वछता मोहिमेत सहभाग घेऊन काशीद येथील समुद्रकिनारा स्वच्छ केला.
या मोहिमेत प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक, काशीद ग्रामपंचायत सरपंच सविता वालेकर, ग्रामसेवक अंकुश शेळके, सामाजिक अधिकारी रोहिदास लोभी, कोस्ट गार्डचे वरिष्ठ अधिकारी अनुप कुमार आदीं मान्यवरांनी सहभाग घेतला
होता.