बिरवाडी : देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना-भाजपची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, असे सांगत मुंबईतील बॉम्बस्फोटाची मालिका अतिरेकी हल्ल्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार केवळ चर्चेवर चर्चा करीत बसले. मात्र, ज्या वेळी देशाच्या जवानांच्या वाहनांवर अतिरेकी हल्ला होऊन ४२ जवान शहीद झाले, त्या वेळी १२ दिवसांत सर्व दलाच्या प्रमुखांशी चर्चा करून शत्रुराष्ट्राच्या हद्दीत घुसून पाकिस्तानला जशास तसे उत्तर केवळ पंतप्रधान मोदीच देऊ शकले म्हणून मोदींसारखे पंतप्रधान होण्यासाठी युतीचा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन महाड, पोलादपूर, माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील युवासेना आयोजित जाहीर सभेत केले.याप्रसंगी व्यासपीठावर युवासेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक शहरप्रमुख नितीन पावले, नगरसेवक चेतन पोटफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध आघाडी असा संघर्ष पेटला असताना, दक्षिण रायगड युवासेनेचे युवाधिकारी विकास गोगावले यांनी महाडच्या आझाद मैदानावर तरुणांची जाहीर सभा घेऊन जबरदस्त शक्तिप्रदर्शन केल्याने राजकीय वातावरण चांगले तापले आहे.
देव, देश, धर्म वाचवायचा असेल, तर सेना-भाजपची सत्ता हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:49 AM