बोर्ली पंचतन/ म्हसळा : रायगडमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर विरोधी पक्ष आधी नुकसानग्रस्त भागामध्ये पोहोचतात, पण सरकार उशिरा पोहोचते ही शोकांतिका आहे. चक्रीवादळाने प्रचंड हानी केली आहे. शासनाने रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीसाठी ७५ कोटी, सिंधुदुर्गसाठी २५ कोटी मदत जाहीर केली. ही मदत म्हणजे कोकणची सरकारने थट्टा केली असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर शासनाने प्रत्येक घरामागे तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली पाहिजे, अशी मागणीदेखील दरेकर यांनी केली. येत्या दोन दिवसांत जर मदत पोहोचली नाही तर श्रीवर्धन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी श्रीवर्धन तालुक्यामध्ये चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी ते बोलत होते. माझ्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवार यांना रायगड जिल्ह्याचा दौरा करावा लागला, असे वक्तव्य त्यांनी केले.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यामध्ये बागायती, घरांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी श्रीवर्धनमध्ये आले होते या वेळी त्यांनी पत्रकाररांशी संवाद साधला. या वेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हा अध्यक्ष दक्षिण रायगड अॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुकाप्रमुख प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.चक्रीवादळानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी सरकारने कोकणासाठी पक्षातून मंत्रीगणांनी तत्काळ येणे गरजेचे होते; परंतु विरोधी पक्षातील आम्ही नुकसानग्रस्त भागात पहिले पोहोचलो, मग शासन आले. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीसाठी ७५ कोटी तर सिंधुदुर्गसाठी २५ कोटी एवढी तुटपुंजी मदत जाहीर केली, ही मदत म्हणजे कोकणची थट्टा आहे. त्या मदतीचा एक रुपयाही नुकसानग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.