नद्यांचे रक्षण केले तर पर्यावरण संवर्धन होईल
By admin | Published: February 2, 2016 02:03 AM2016-02-02T02:03:55+5:302016-02-02T02:03:55+5:30
नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल
नेरळ : नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यामुळे जिवंत नद्यांचे रक्षण करण्याचे आवाहन जीवित नदी अभियानाच्या शैलजा देशपांडे यांनी केले. नेरळ येथे नद्या जिवंत ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम उघडली आहे, त्यावेळी पर्यावरणप्रेमी देशपांडे बोलत होत्या.
पुणे येथे जीवित नदी अभियान राबविणाऱ्या शैलजा देशपांडे यांच्या अभियानाचे काम कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्या संध्या देवसस्थळे यांनी सुरु केले आहे. त्या माध्यमातून नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्ट येथे महिलांना आणि नेरळ ग्रामपंचायतमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना नद्या जिवंत कशा ठेवायच्या याबद्दल शैलजा देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याआधी जीवितनदी अभियान अंतर्गत जनजागृती कार्यशाळा नेरळ मधील विद्या विकास शाळेत आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, पर्यवेक्षिका अरु णा जोगळेकर, तसेच अनेक शिक्षक,विद्यार्थी आणि पुढाकार घेणाऱ्या संध्या देवसस्थळे उपस्थित होत्या. विद्यार्थी यांच्या माहितीसाठी पुणे येथील मुठा नदीमध्ये या अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. तर नंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या शैलजा देशपांडे यांनी नेरळ विद्या विकास शाळेत विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.
देशपांडे यांनी देशातील सर्वच नद्या मृत झाल्या असल्याचा दावा त्यावेळी केला. ज्यावेळी नद्या उगम पावते त्यावेळी ती जिवंत असते परंतु पठारावर गेल्यानंतर ती मृत होते अशी माहिती त्यांनी दिली. मृत झालेली नदी कशी ओळखायची याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतांना त्यांनी ज्या ठिकाणी नदीमध्ये जलपर्णी वाढते तेथे मोठ्या प्रमाणात बगळे आणि कावळे जमा झालेले असतात.त्यावरून ती नदी मृत आहे असे समजावे अशी माहिती देशपांडे यांनी दिली.(वार्ताहर)