अलिबाग - राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, राज्यातील ६ खासदारांचीही मुदत २ फेब्रुवारीला संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. सुनील तटकरे हे राज्यसभेवर गेल्यास रायगड लोकसभेची जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
शिवसेना-शिंदे गट, भाजप, अजित पवार गट सत्तेत आहे. सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच- गेले काही दिवस रायगड लोकसभा जागेवरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे, तर रायगड लोकसभा लढविणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. - दुसरीकडे शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपने पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आणले आहे. - अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या समन्वय मेळाव्यात याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र आहे. तटकरे यांना राज्यसभेवर पाठविल्यास रायगडच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस इतरत्र जागा मागण्याची शक्यता आहे.