“काम होणार नसेल; तो शब्द कधी देऊ नये”; मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 05:39 AM2023-10-28T05:39:41+5:302023-10-28T05:41:28+5:30
काम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना दिला होता. उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : काम होणार नसेल तो शब्द कधी देऊ नये, अशा कानपिचक्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या. शरद पवार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांना मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर विचारण्यात आले होते. जरांगे पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवाद साधला असल्याचे पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यावर जरांगेंनी मुदत वाढवून दिली होती. त्या काळात काम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिला होता. उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
बबनराव ढाकणे जिद्दीचा कार्यकर्ता
यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. बबनराव ढाकणे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते. गरीब कुटुंबातील आणि जिद्दीचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक होता. ते जनता पक्षात होते. त्यांनी जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेतृत्वही केले आहे. लोकांच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करणे हा त्यांचा स्वभाव होता. ते उत्तम सहकारी होते, असे शरद पवार यांनी म्हटले.