कार्लेखिंड : मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या काळात सामान्य नागरिकांना वाईट दिवस अनुभवावे लागले. रोजगार, नोटाबंदी, जीएसटी यामुळे अनेक व्यवसाय बुडाले. आमचे सरकार होते तेव्हा जीएसटी कायदा लागू करण्याचे काम आम्ही करत होतो. त्या वेळी ज्या ठिकाणी भाजप सरकार होते त्यांनी तिथे विरोध केला होता. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना या आरसीएफ प्रकल्पाला चालना दिली होती. तरुण सुशिक्षित पिढीला नोकरी लावण्याचे काम आम्ही केले होते. नागोठणे येथील आयपीसीएल कंपनीतील गेल्या चार-सहा महिन्यांमध्ये मी निवृत्त भूमिपुत्रांच्या मुलांना आयपीसीएल कंपनीमध्ये सामावून घेण्याचे काम केले आहे. मी खासदार झाल्यावर येथील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन, असे आश्वासन आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिले.रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०१९ चे उमेदवार सुनिल दत्तात्रेय तटकरे यांच्या प्रचारार्थ खडताळपूल येथे आयोजित करण्यात आली होती, या वेळी तटकरे बोलत होते. राजकारणाबरोबरच समाजकारणाचे काम पाटील आणि तटकरे कुटुंबीयांच्या तीन पिढ्या करत आहेत. आमची संस्थाने खालसा करण्याची वार्ता जे करत आहेत ते करू शकत नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला. येथील मच्छीमार बांधवाचे प्रश्न आमच्या शासनाच्या काळात मांडले होते. त्या वेळी मांडवा जेटीची उभारणी आम्ही केली आहे. येथील पर्यटनाला चालना मिळाली. अलिबाग रेल्वेचे प्रश्न का उपेक्षित आहेत. गीते सहा वेळा खासदार झाले; परंतु आपल्या खात्यामार्फत कोणतेही काम त्यांनी केलेले नाही. या राज्यामध्ये आपल्या खात्यातून एकही कारखाना उभारलात का? असा खडा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून या तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या अटीवर सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला आहे, असे नमूद केले. २००९ च्या निवडणुकीत गीतेंना आरसीएफ प्रकल्पग्रस्त आणि पीएपीचे प्रलंबित प्रश्नांच्या अटीवर मदत करण्यात आली होती; परंतु गीते यांच्याकडे वेळोवेळी आठवण करूनही अजूनपर्यंत पश्न मार्गी लावले नाहीत, त्यामुळे आम्ही तटकरे यांना पाठिंबा देत आहोत. या प्रकल्पातील निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना त्या जागी नोकरीला लावणे. स्थानिकांच्या जमिनी घेऊन येथील तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत. कोळी समाजाच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या जागा कोळी बांधवांच्या मालकीच्या आहेत, असे एक ना अनेक प्रश्न केंद्रात लावून धरण्याचे काम तटकरे यांनी करावेत. केंद्रीय निधी रायगड जिल्ह्याला अधिक कसा मिळेल, असे प्रयत्न केले पाहिजेत. या सरकारने आरसीएफ थळ प्रकल्प -३ येण्यापासून रोखले आहे. हा कारखाना खासगीकरणाच्या घशात घालण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि खासगीकरण झाले तर येथील तरुण देशोधडीला लागेल, असे पाटील म्हणाले.या वेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, राजिप उपाध्यक्ष, आस्वाद पाटील, राजिप सदस्य चित्रा पाटील, नृपाल पाटील आदी उपस्थित होते.
खासदार झाल्यास भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:29 AM