- अभय आपटेरेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौल हे अष्टागारातील एक प्रमुख ठिकाण असून, ३६० मंदिरे व तितकेच तलाव अशी गावाची ओळख आहे. पुरातन नगर, प्रसिद्ध व्यापारी बंदर असलेल्या चौल-आग्राव बंदराकडे जाताना मुघलकालीन हमामखाना असून (स्नानगृह) डागडुजीअभावी दुर्लक्षित राहिले आहे.कुंडलिका खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले चौल हे एकेकाळी आंतरराष्ट्रीय व्यापार बंदराबरोबर हिंदूंचे व्यापारी केंद्र होते. ऐतिहासिक काळात चौलचा अप्पर चेऊल, नार्थ चेऊल, सिटी आॅफ द मुसी असे उल्लेख आजही आढळतात. या गावात अनेक इमारती १६ पाखांड्यामध्ये विभागल्याने उत्तम बाजारपेठ असा उल्लेख चौल टॉलेमी या प्रवाशाने केल्याची नोंद आहे. ग्रीक व्यापाराने चौलचा सिबर असा उल्लेख केला आहे. १४७० मध्ये रशियन पहिला प्रवासी अफनासी निकीतन हा व्यापारी आला.चौलमध्ये हमामखाना या पुरातन वास्तूत उत्तरेच्या भिंतीत कमानीयुक्त सहा ओवºया असून, पूर्वेकडील दरवाजाच्या दोन कमानीतून प्रमुख दालनात जाता येते. या ठिकाणी आता पडझड झाली असून, फक्त अवशेष शिल्लक आहेत. प्रमुख दालनातील घुमट पडलेला असून दालनाच्या मध्यभागी पूर्वी अष्टकोनी कारंजे असावेत. दालनाच्या उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूच्या भिंतीत कमानीयुक्त बैठकीची सोय आहे. दोन स्नानगृह असून स्नानगृहाच्या दक्षिणेस जुन्या मशिदीचे अवशेष आढळतात. हमामखान्याकडे जाण्यापूर्वी या भागात कबरसाना असावे. या दुर्लक्षित वास्तूंकडे पुरातन खात्याने लक्ष दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
चौलमधील मुघलकालीन हमामखाना दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:13 AM