अलिबाग : रोहे-भुवनेश्र्वर येथील एकता नगर परिसरातून बेकायदा शस्त्रास्त्र विकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. या गुन्ह्यातील सूत्रधाराचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.आरोपींकडून एक चाकू, दोन विदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि ३१ काडतुसे हस्तगत केली आहेत. यातील २४ काडतुसे जिवंत असून यातील रिव्हॉल्व्हर डमी असण्याची शक्यता व्हनकोटी यांनी व्यक्त केली.गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बेकायदा शस्त्रे विकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार उप पोलीस निरीक्षक अजित पाटील, हवालदार चंद्रकांत बाळाराम पाटील, मधू डोरे, पोलीस नाईक सचिन शेलार, सुरेश वाघमारे यांनी कारवाई केली. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा रेल्वेमध्ये चोरी करणारा आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांचा अजून एक साथीदार असून त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे विकण्यासाठी आणलेली शस्त्रे ही एका चोरीतील असल्याचीही कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली असल्याची माहिती व्हनकोटी यांनी दिली. पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी हे स्थानिकच असल्याचे व्हनकोटी यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरीच्या घटना घटत आहेत. आतापर्यंत चार गुन्ह्यांपैकी माणगावच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. अन्य तीन गुन्ह्यातील आरोपी हे एकाच टोळीतील असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
बेकायदा शस्त्रे विकणारे अटकेत
By admin | Published: September 11, 2015 11:32 PM