अलिबाग समुद्र किनार्यावरील बेकायदा बंगल्यांवर जिल्हाधिकार्यांचा बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 02:54 PM2018-09-21T14:54:56+5:302018-09-21T14:57:37+5:30
अलिबाग समुद्र किनार्यावरील बेकायदा बंगल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
जयंत धुळप
अलिबाग - पर्यावरण आणि शहर नियोजन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी सकाळी शहाजीदा आर. कुंदनमल यांच्या मालकीचा धोकवडे (अलिबाग) येथील बेकायदा बंगला बुलडोझर व अन्य यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पाडण्याच्या कारवाईस सुरुवात केली.
अलिबाग तालुक्यांच्या समुद्र किनाऱ्यावरील बांधलेल्या बेकायदा बांधकामाविरुद्ध सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेच्या सुनावणी अंती मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (कलम12), महाराष्ट्र रीजनल अँन्ड टाऊन प्लॅनिंग अॅक्ट (एमआरटीपी, कलम ५२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (कलम ४५, उपविभाग २) ही कारवाई करण्यात येत होती.
दरम्यान, आज दुपारी जिल्हा प्रशासनास कळविले की, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत बंगला पाडण्याची कारवाई थांबविण्यासाठी तोंडी आदेश दिले असल्याचे, मुंबई उच्च न्यायालयातील सरकारी वकीलांनी आम्हाला कळविले असल्याने ही कारवाई तात्पूर्ती थांबविली आहे. मात्र दुपारी तीन वाजता न्यायालयाकडून जे आदेश प्राप्त होतील त्या प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल असे डॉ.सूर्यवंशी यांनी पुढे सांगितले. दरम्यान अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी शारदा पोवार हे या संदर्भातील पुढील कार्यवाही पूर्ण करतील असे त्यांनी सांगितले.