महाड तालुक्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन; स्थानिक प्रशासनाचा कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:37 AM2020-12-04T01:37:14+5:302020-12-04T01:37:19+5:30
संचारबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याने अनेक दिवसांपासून बंद असलेला बांधकाम व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे.
दासगाव : महाड शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांना मुबलक प्रमाणामध्ये वाळूचा पुरवठा होत आहे. नदी पात्रांतून बेकायदेशीर वाळूचे उत्खनन होत आहे. तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.
संचारबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याने अनेक दिवसांपासून बंद असलेला बांधकाम व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. या बांधकामाला आवश्यक असणारी वाळू उत्खनन करण्यास शासनाने परवागी दिली नसल्यामुळे अनेक ठिकाणचे बांधकाम वाळू मिळत नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे. मात्र महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी, काळ, नागेश्वरी आणि छोट्या नाल्यांतून बेकायदेशीर वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. विना रॉयल्टी असलेली हजारो ब्रास वाळू बांधकामांना पुरविण्याचे काम सुरू झाले. तालुक्यातील कुंबळे, सापे, ओवळे, आंबेत, म्हाप्रळ, कोकरे, टोळ इत्यादी परिसरांसह वाळण, नाते - रायगड विभागात बेकायदेशीर वाळू उत्खनन होत आहे. या ठिकाणांहून महाड शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक बांधकामांना वाळूचा पुरवठा सुरू झाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी महाड पोलिसांनी तालुक्यातील ओवळे गावाजवळ असलेल्या सावित्री खाडीमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन करीत असलेल्या माफियांवर कारवाई केली. सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. सहा जणांवर कारवाई करण्यात आली. यामुळे विनापरवाना वाळू उत्खनन बंद झाले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वाळूचा पुरवठा महाड शहरातील बांधकामांना सुरू झाला आहे. महाड शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक मार्गावर चेकनाका असून त्या नाक्यांवर पोलिसांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. याच चेकनाक्यांवरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक दिवसरात्र सुरू आहे.
कारवाईची मागणी
दासगाव, सापे, टोळ, बिरवाडी, वाळण, मांघरुण, वाघेरी, पाने, पंधेरी या परिसरामध्ये वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाड तालुक्यामध्ये सुरू असलेली बेकायदेशीर उत्खननाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी कोकण विभाग आयुक्तांकडे तालुक्यातील पर्यावरण संस्थांनी केली आहे.