उरण : पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतरही खोल समुद्रात बेकायदा मासेमारी करणाऱ्या करंजा-उरण येथील दोन मच्छीमार बोटींवर गुरुवार, २ जुलै रोजी कारवाई करीत ताब्यात घेण्यात आल्या. याबाबतची माहिती उरण साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणे यांनी दिली.
उरण तालुक्यातील खोपटा येथील रिलायन्स जेट्टी परिसरात शासनाच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतरही खोल समुद्रात बेकायदा मासेमारी करण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार रायगड जिल्हा साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुरेश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणे यांनी आपल्या पथकासह धाड टाकली.
या धाडीत गावदेवी भवानी प्रल्हाद, आई अन्नपूर्णा या दोन मच्छीमारी बोटी मासेमारी करीत असल्याचे आढळून आल्या. या बेकायदा मासेमारी बोटींवर कारवाई करीत ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. याआधीही याच परिसरात अवैध मासेमारी करणाºया सहा मच्छीमार बोटींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उरण साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणे यांनी दिली. अशा अवैध मासेमारी करणाºया या बोटींचा मासेमारी परवाना रद्द करण्याची व शासकीय कोट्यातील डिझेलचा कोटा बंद करण्याची कारवाई होऊ शकते.