नागोठणे : बाजारहाटासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांकडून दुचाकी, चारचाकी वाहने शिवाजी चौक किंवा एसटी बसस्थानकाच्या आवारात उभी करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. बसस्थानक सध्या एसटी बसेस ऐवजी खासगी वाहनांनी फुलून जात असल्याने एसटीला त्याचा फटका बसत आहे. ही वाहतूक कोंडी होण्यामागे एसटी महामंडळ तसेच पोलीस विभाग नागोठणे ग्रामपंचायतीकडे बोट दाखवत आहे. तर वाहतूक कोंडी होण्यामागे आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडून हात झटकले जात असून या बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी बिनदिक्कतपणे कारवाई करावी, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
येथील वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या नादात सुबत्ता वाढून एका घरात दोनचार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे ऐश्वर्य येत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क करण्याचा प्रकार वाढीस लागला व त्याचा सर्वात जास्त फटका येथील शिवाजी चौक तसेच एसटी बसस्थानक आणि प्रभूआळीतील गांधी चौकाला प्रामुख्याने बसत आहे. रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी तर याचा बोजवाराच उडत असून या परिसरात बेकायदा पार्क केलेल्या वाहनांनी रस्ताच फुलून गेलेला असतो. रविवारी ८ डिसेंबरला सायंकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान येथील एसटी बसस्थानक अनधिकृत उभ्या राहिलेल्या वाहनांनी भरून गेले होते.
उत्सुकतेने या वाहनांची मोजणी केली असता, आवारात उभ्या असलेल्या खासगी वाहनांमध्ये २६ कार आणि जीप तसेच साधारणत: सव्वादोनशे दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी असल्याचे दिसून आले. या वाहनांमुळे स्थानकाचा ७५ टक्के परिसर व्यापून गेला असल्याने आलेल्या एसटींना या वाहनांमधून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र दिसून येत होते. याबाबत येथील वाहतूक नियंत्रकांना विचारले असता, आवारात येणाºया अनधिकृत वाहनांमुळे आम्ही हतबल झालो असून नागोठणे पोलिसठाणे, ग्रामपंचायत तसेच आमच्या रोहे एसटी आगाराचे अनेकदा लक्ष वेधले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमची इतर महत्त्वाची कामे करून या वाहनचालकांना येथून पिटाळून लावण्याचे काम सुद्धा आम्हाला करावे लागतअ असे त्यांनी सांगितले. ज्या दिवशी नागोठणे बसस्थानकाचे आवारात फक्त एसटी बसेसच उभ्या राहतील, तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस असेल असे त्यांनी या त्रासाला कंटाळून सांगितले.
वाहतुकीची कोंडी दूर करणे, हे ग्रामपंचायतीचे कामच नसून पोलिसांनी सर्व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, ग्रामपंचायतीकडून पोलिसांना १०० टक्के सहकार्य असेल, असे स्पष्ट केले. हातगाड्यासुद्धा वाहतुकीस अडथळा ठरत असतील, तर पोलिसांनी त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी. नागोठणे ग्रामपंचायतीकडून हॉटेल लेक व्ह्यूनजीक मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध केली असतानाही वाहने त्या ठिकाणी उभी केली जात नाहीत. पोलिसांनी शिस्तीचा बडगा उचलून या अनधिकृतरीत्या उभ्या राहणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी आणि यात सातत्य राखावे, अशी अपेक्षा आहे. - डॉ. मिलिंद धात्रक, सरपंच.
शिवाजी चौकात फेरीवाले, तसेच हातगाड्या कुठेही उभ्या राहात असल्याने वारंवार वाहतूककोंडी होते. नागोठणे ग्रामपंचायतीचे या गंभीर प्रश्नाकडे अनेकदा लक्ष वेधले, त्यांना निक्षून सांगितले. शिवाजी चौकात आमचा वाहतूक पोलीस तैनात करण्यात येत असतो. मात्र, त्याला या ड्युटीबरोबरच महामार्गाच्या पलीकडे असणाºया शाळेच्या वाहतूक नियंत्रणाची भूमिकासुद्धा बजावावी लागत असते. मंगळवार, १० डिसेंबरपासून सेवेत असणाºया वाहतूक पोलिसांना शिवाजी चौक, तसेच परिसरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश देण्यात येणार आहे व यातून कोणाचीही सुटका होणार नाही.- दादासाहेब घुटुकडे, पोलीस निरीक्षक.