खाडीत अवैध रेती उत्खनन
By admin | Published: September 25, 2015 02:23 AM2015-09-25T02:23:21+5:302015-09-25T02:23:21+5:30
रोहा तालुक्यातील भालगाव खाडीत कांडणेमध्ये यंत्राच्या सहाय्याने रेतीचे अवैध सक्शन पंपाच्या सहाय्याने उत्खनन सुरु झाले आहे
रोहा : रोहा तालुक्यातील भालगाव खाडीत कांडणेमध्ये यंत्राच्या सहाय्याने रेतीचे अवैध सक्शन पंपाच्या सहाय्याने उत्खनन सुरु झाले आहे. या बेकायदा उत्खननावर रोह्याच्या तहसीलदार उर्मिला पाटील यांनी ठोस कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
रोहा तालुक्यात हातपाटीद्वारे रेती उत्खनन करण्यास जिल्हा महसूल शाखेने परवानगी दिली आहे. हातपाटीने रेती उत्खनन करण्याचा परवाना देताना शासनाने एका पानाचा परवाना आणि चार पानाच्या अटी संबंधित व्यावसायिकांना घातल्या आहेत. मिळालेल्या परवानगीप्रमाणे समुद्रात उड्या मारुन वाळूचे उत्खनन केले जात आहे. कांडणे खाडीत हातपाटीने रेती काढण्याचा परवाना अशोक केरु धोत्रे यांना देण्यात आला आहे. भालगाव हे गाव रोहा शहरापासून २२ किलोमीटर दूर दुर्गम भागात असल्याने तेथे सहसा शासकीय यंत्रणा नियमित पोहचत नाही. या खाडीत हातपाटीने रेती उत्खननाची परवानगी घेऊन त्याऐवजी सक्शन पंप, होड्या आदी यंत्रणेच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन करण्याची शक्कल संबंधितांनी लढविलेली आहे. मात्र जागृत नागरिकांमुळे त्यांना येथे चोरी छुपे रात्रीबेरात्री रेतीचे उत्खनन व वाहतूक करावी लागत आहे. या गैरप्रकारामुळे सतत वादविवाद होऊन परिसरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असून शासकीय यंत्रणा आणि जिल्हा पोलिसांनी वेळीच या अवैध रेती उपशावर कारवाई न केल्यास भविष्यात या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे. रात्रीच्या दरम्यान रोहा दमखाडी परिसरात व शहरातील इतर बिल्डरांना इमारतीच्या बांधकामासाठी ही वाळूचा पुरवठा केला जात आहे. जिल्हाधिकारी शीतल उगले आणि पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी हातपाटीद्वारे उत्खनन करण्याचा परवाना दिलेल्या व्यावसायिकांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)