मुरुडच्या मिठागर भागात अवैध वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:19 PM2020-02-26T23:19:31+5:302020-02-26T23:19:37+5:30
महसूल विभागाची कारवाई; रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले
आगरदांडा : सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मिठागर भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू असून, शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता खाडीमधील वाळू काढून गैरमार्गाने विक्री करण्यात येत होती. महसूल विभागाला याबाबत महिती मिळाली असता कारवाई करत वाळूचा साठा जप्त केला.
मिठागर येथे बंद पडलेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार गमन गावित यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी मंडळाधिकारी विजय म्हापुसकर व तलाठी यांच्यासह घटनास्थळी जाऊन तेथील वाळूचा साठा जप्त केला आहे. तहसीलदार गमन गावित यांच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाºया वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध रीत्या पकडलेला वाळूसाठा हा ७५ हजार रुपयांचा होता. ही पकडलेली वाळू लिलाव पद्धतीने विकण्यात आली आहे. या प्रकरणी कोणालाही अटक केली नाही. हा वाळू अड्डा जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आला. या धाडीत सक्शन पंप अथवा बोटसुद्धा मिळाली नाही.
ही कार्यवाही तहसीलदार गमन गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप, नायब तहसीलदार प्रल्हाद कौटुंबे, मंडळ अधिकारी विजय म्हापुसकर, तलाठी रूपेश रेवस्कर, तलाठी रेश्मा वीरकूड, तलाठी वनिता जायभाय, कोतवाल संदीप कोम आदी उपस्थित होते.
गस्त वाढवण्याची मागणी
मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत ही तालुक्याची शेवटची ग्रामपंचायत असल्याने मुरुड शहरापासून असणारे अंतर हे खूप लांब असल्याने या भागात अवैध वाळूउपसा करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.
महसूल विभागाने येथील अवैध वाळूउपसा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी गस्तीचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.