पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दररोज या ठिकाणच्या मार्गिकेत बदल केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. या ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किं ग करण्यात येत असल्याने लहान वाहनांचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यालगत अवजड वाहनांच्या पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पळस्पे, चिंचवन, शिरढोण आदी गावांचा समावेश आहे. गावांलगत मोठमोठे गोदाम असून, मालवाहतूक करणाºया अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. ही वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने स्थानिकांची गैरसोय होत आहे. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडतो. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.पळस्पेतील जेडब्ल्यूसी कंपनीजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज दोन्ही बाजूस अवजड वाहने उभी असतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेल्या आदिवासीवाडी तसेच गावकºयांना या वाहनांचा अडथळा निर्माण होतो. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी चालकांकडून सर्रास अजवड वाहने उभी केली जातात. मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातात हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आर्श्चय म्हणजे वाहतूक पोलिसांकडूनही अनधिकृतपणे होणाºया अवजड वाहनांच्या पार्किंगवर कारवाई होताना दिसत नाही.यासंदर्भात नवीन पनवेल वाहतूक शाखेचे अनिल संगपाल यांना विचारणा केली असता, सर्व्हिस रोडला वाहन पार्क केली जातात, मुख्य रस्त्यावर नाही. सर्व्हिस रोडचा उपयोग कोणीच करीत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. मात्र, सर्व्हिस रोडवर वाहन पार्क करण्याची परवानगी चालकांना आहे का, अशी विचारणा केली असता त्यांनी अशा वाहनांवर कारवाई केली जाईल, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.वाहतूककोंडीपनवेल, कळंबोली, कामोठे परिसरातील अनेक सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांचे पार्किंग करण्यात येते. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून गुन्हेगारीचे प्रकारही वाढले आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील खांदा वसाहत परिसरात सध्या भुयारी मार्ग, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच अवजड वाहने रस्त्यात उभी असल्याने कोंडी होत असून, लहान वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.
महामार्गावर अवजड वाहनांची अवैध पार्किंग; स्थानिक रहिवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 3:33 AM