रोहा : रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर सुरू होती. संचालक मंडळाने याकालावधीत संबंधितांच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नव्हती. गावातील मंडळींनी याविरोधात आवाज उठवीत संचालक मंडळास धारेवर धरल्याने बुधवारी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.भाटे सार्वजनिक वाचनालय या शंभरी पूर्ण केलेल्या रोह्यातील संस्थेत मोठा अपहार झाल्याचे, तसेच संचालक मंडळाने हे प्रकरण दाबून ठेवल्याची गेले दोन महिने चर्चा होती. आप्पा देशमुख, नितीन परब, विजय देसाई आदी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत तलवार यांची भेट घेतली. त्यामध्ये सचिव अजिंक्य वाकडे यांनी परस्पर या रकमेचा अपहार केल्याचे समजताच झालेल्या आर्थिक गैरप्रकारांबाबत पोलिसांत तातडीने तक्रार करण्याची सूचना तलवार यांना करण्यात आली होती. त्याप्रमाणे तलवार यांनी त्वरित संचालक मंडळाची बुधवारी बैठक बोलावली.या वेळी तातडीने दोषींवर पोलीस कारवाई करणे, संस्थेचे आॅडिट करणे, तसेच कारवाई पारदर्शक व्हावी यासाठी पदाधिकारी यांनी राजीनामे देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. त्याप्रमाणे कार्यवाही करीत बुधवारी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तसेच आॅडिटरचीही नेमणूक करण्यात आली आहे.ग्रामस्थ आले एकत्रजागरूक नागरिकांनी एकत्र येत केलेल्या प्रयत्नांमुळे रोहा शहरातील हा अपहार सर्वांसमोर आला आहे. मुख्य आरोपी व त्याला मदत करणाऱ्या पडद्यामागील सूत्रधारांवर कारवाईसाठी आॅडिट रिपोर्ट आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडेही शिष्टमंडळाच्या वतीने अतिरिक्त तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती संजय कोनकर यांनी दिली.
रोह्याच्या भाटे वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:02 AM