राजेश भोस्तेकरअलिबाग : अलिबाग मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात दुरावस्थेबाबत लोकमत मार्फत वारंवार पाठपुरावा बातमीच्या रूपातून केला जात आहे. जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर या मथळ्याद्वारे प्रसिद्ध केलेल्या बातमीचे कात्रण दाखवून शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे. अलिबाग येथील रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाची नादुरूस्त झाल्याने नवीन इमारत बांधण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जावी, अशी आग्रही मागणी शेकापचे आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्याद्वारे सरकारकडे केली आहे.
जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांना हक्काचे रूग्णालय समजल्या जाणार्या जिल्हा सामान्य रूग्णालयाची अवस्था एखाद्या रूग्णासारखी झाली आहे. याबाबत लोकमतमध्ये सातत्याने आवाज उठविला जात आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण दाखवून रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबात दृष्टिक्षेप टाकला. जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रीय कक्षाच्या छतातून गळती सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी एकही शस्त्रक्रीया न झाल्याने गरीब व गरजू रुग्णांना खाजगी रूग्णालय किंवा मुंबई, नवी मुंबईतील रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
शस्त्रक्रिया विभागासह रूग्णालयाच्या आवश्यक दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करणे, या इमारतीवर आतापर्यंत १५ ते २० कोटीहून अधिक खर्च झाला असून सदर इमारत जीर्ण अवस्थेत आहे, असे ते म्हणाले.तसेच निकृष्ट काम करणार्या ठेकेदारावर व संबंधित अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असणे, तसेच या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना होवू नये यासाठी राज्य शासनाने नवीन इमारत बांधण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.