पारंपारीकतेची कास धरीत गणपतींचे विसर्जन, भावूकतेनं बाप्पांना निरोप
By निखिल म्हात्रे | Published: September 1, 2022 11:17 PM2022-09-01T23:17:01+5:302022-09-01T23:18:20+5:30
श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती.
अलिबाग - एक... दोन... तिन... चार... गणपतीचा जय जयकार..., गणपती बाप्पा मोरया या… पुढच्या वर्षी लवकर या... जयघोषांसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. बुधवारी मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. काल रात्री व आज दुपारपर्यंत असा दीड दिवस पकडला जातो. त्यानुसार आज दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली. गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या दीड दिवस मुक्कामाच्या सार्वजनिक 12 तर 25 हजार 728 घरगुती गणपतींना गुरुवारी जिल्ह्यात ढोलताशाच्या गजरात, भजन-किर्तनात आणि गणपती गेले गावाला.. चैन पडेना आम्हाला असा गजर करीत निरोप देण्यात आला.
जिल्ह्यात गणेश विसजर्नाच्या निमीत्ताने सर्व सामुद्र किनारे आज फुलून गेले होते. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसजर्न मिरवणुकांच्या निमीत्ताने कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रंनी दिली.
गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी तैनात आहेत. याबरोबर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी किनारा परीसरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीतून भक्तांची चांगलीच सुटका झाली.