अलिबाग - रायगड जिल्ह्यातील पशुधनावर लाळखुरकतचे संकट येऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. लाळखुरकत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम गावागावात राबविली जात आहे. जिल्ह्यात दोन लाखहून अधिक लसीचा साठा उपलब्ध झाला असून तालुका स्तरावर त्याचे वितरण सुरु केले आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत शंभर व महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातंर्गत 22 पशुवैद्यकीय दवाखाने आहे. जिल्ह्यात 2 लाख 35 हजार 372 गाय, म्हैस आदी जनावरे आहेत. या दवाखान्यांद्वारे गावपातळीवर गाय, म्हैस, बैलसारख्या जनावरांवर उपचार केले जातात. जिल्ह्यात सध्या थंडीचा हंगाम आहे. या थंडीत गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या तसेच बैलांना लाळखुरकत रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. लाळखुरकत हा खुरे असणाऱ्या प्राण्यांचा विषाणूजन्य आजार आहे. तो जनावरांच्या लाळेमार्फत पसरतो. आजारी जनावरांची वाहतूक, चारा, पाणी, शेतकऱ्यांनी आजारी गोठ्यावर जाणे, यामुळे हा आजार पसरण्याचा धोका वाढतो.
शरीरातील पाणी कमी होणे, तोंडाला जखमा होणे, पायातील खुराच्या जखमा होणे, जनावरांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. हा धोका टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यात जनावरांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लाळखुरकत आजाराला रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुधन विभाग कामाला लागले आहे. यासाठी जिल्ह्यात जनावरांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. पंधरा दिवसांत लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
लसीकरणाचे फायदे -लसीकरणामुळे हा रोग होण्याची शक्यता कमी होते. जनावरे सुरक्षित राहतात. दुग्धव्यवसायातील धोका टळतो. जनावरांची उत्पादन क्षमता अबाधित राहते. दूध, लोकर, मांस व मांसजन्य पदार्थांचे उत्पादन सुरक्षित राहते.तालुकानिहाय लसीचा साठा
श्रीवर्धन- 6400पनवेल- 11,000पेण- 12,800तळा- 8500कर्जत- 32,500अलिबाग- 11,300म्हसळा- 9300खालापूर- 11,800मुरुड- 6300रोहा- 16400सुधागड- 14,300महाड- 27,850पोलादपूर- 12,250माणगाव- 19,100उरण- 3500एकूण- 2,03,300