उमरोली ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याच्या ढिगांमुळे वाढला डासांचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:17 PM2019-07-24T23:17:52+5:302019-07-24T23:18:00+5:30
अनेक ठिकाणी अस्वच्छता : स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसळ, उमरोली, गारपोली, कोषाणे, आषाणे, वावे, आषाणे वाडी, कोषाणे वाडी,पाली वसाहत, पोतदार संकुल, डायमंड, तुलसी अशी अनेक गावे, वाड्या मोठी गृहसंकुलांचा समावेश आहे. या परिसरात उघडी गटारे, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डायमंड वसाहतीचा कचरा बाजूलाच टाकला जात आहे. तो कचरा ग्रामपंचायत उचलत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. डिकसळ गावाशेजारी बाजूला इंग्रजी माध्यम शाळा आहे. मुलांच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. बिल्डर आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील स्थानिक करत आहेत.
ग्रामपंचायतीकडे फॉगिंग (धूरफवारणी यंत्र) पेस्ट कंट्रोल जंतू नाशक फवारणी यंत्र धूळखात आहेत. ग्रामपंचायतीच्या मालकीची घंटागाडी बंद अवस्थेत आहे. भाडेतत्त्वावर घंटागाडी चालू आहे, एक दिवसआड कचरा उचलण्यात येतो. नियमित घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग वाढले आहेत. परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत पण ग्रामपंचायतीचे कुठले नियोजन नाही.त्यामुळे ग्रामपंचायती इकडे लक्ष देईल का आणि डासांचा प्रादुर्भाव कमी होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे न झाल्यास नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागणार आहे.
फवारणी मशिनसंदर्भात आमच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असून फवारणीचे काम दिले आहे. परंतु पाऊस असल्याने फवारणी करता येत नाही. तसेच घंटागाडी सुरू आहे. सर्वच ठिकाणी कचरा उचलला जातो. ज्या ठिकाणी जात नसेल तिथेही कचरा उचलला जाईल. - विनोद चांदोरकर, ग्रामविकास अधिकारी, उमरोली ग्रामपंचायत