मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी इंदू मिल येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परदेश दौरा जास्त महत्त्वाचा वाटतो, असा आरोप करीत मुंबई काँग्रेसने मोदी-फडणवीसांच्या निषेधार्थ आंदोलन केले. या वेळी इंदू मिल येथे प्रतीकात्मक भूमिपूजन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू मिल येथे प्रतीकात्मक भूमिपूजन आणि आंदोलन केले. काँग्रेसने या स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. आज आंबेडकर जयंती असल्याने भूमिपूजन करण्याची गरज होती. मात्र सरकारला या प्रश्नाचे सोयरसुतक नसल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री परदेश दौऱ्यात मश्गुल आहेत. सरकारने लवकरात लवकर स्मारकाचे भूमिपूजन करावे. केंद्र व राज्य सरकार आंबेडकर स्मारकाबाबत जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी राज्य शासनातर्फे कोणताही महत्त्वाचा मंत्री, भाजपा-शिवसेनेचा महत्त्वाचा नेता चैत्यभूमीकडे फिरकला नाही. बाबासाहेबांची जयंती देशात मोठ्या प्रमाणावर साजरी करायला हवी, असे निरुपम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हे श्रेयाचे राजकारण - रामदास आठवलेच्डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे अधिकृत भूमिपूजन काँग्रेसकडून व्हायला हवे होते. मात्र, इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात वेळकाढूपणा केल्याने आज काँग्रेसवर प्रतीकात्मक भूमिपूजन करण्याची वेळ आल्याची बोचरी टीका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली. हे प्रतीकात्मक भूमिपूजन नव्हे, तर श्रेयाचे राजकारण असल्याचेही आठवले म्हणाले. च्इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या निर्णयाबाबत आठवलेंनी आपल्या समर्थकांसह आज चैत्यभूमी ते इंदू मिलदरम्यान विजयी मिरवणूक काढली. इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचे येत्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हायला हवे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. च्या वेळी आठवले यांनी काँग्रेसच्या आंदोलनावरही निशाणा साधला. काँग्रेसने या स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यामध्ये टाळाटाळ केली; आणि आता प्रतीकात्मक भूमीपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. च्काँग्रेसने नेहमी दलितांच्या मतांचा वापर केला मात्र त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे आगामी काळात त्यांना दलितांची मते मिळणार नाहीत, असा दावा आठवले यांनी केला. चैत्यभूमीसमोरील समुद्रात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
भूमिपूजनाऐवजी परदेश दौऱ्याला महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2015 1:58 AM