अलिबाग - रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आला. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.मुंबई-गोवा या महामार्गावर ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ झाल्याने काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तालुक्यात विविध संघटनांनी शांतता रॅलीद्वारे घटनेचा निषेध नोंदविला. सायंकाळी ५ वाजल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले.अलिबाग येथील बाजारपेठा सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्या होत्या, तसेच अलिबाग एसटी आगारातून गाड्याही सोडण्यात येते होत्या. बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर सकाळी अलिबाग परिसरातून निषेध रॅली निघाली होती. वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. पेण, कोलाड, माणगाव, महाड या मार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यासह अलिबाग, कर्जत, पनवेल, उरण, रोहे, मुरुड, पोलादपूर, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, रसायनी, खालापूर येथेही आंदोलन करण्यात आले.
रायगडमध्ये ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 5:14 AM