जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती, दुबार पेरणी क्षेत्र व पीक उत्पादकतेत वृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:49 AM2018-04-13T02:49:15+5:302018-04-13T02:49:15+5:30

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे रायगड जिल्ह्यात दुबार पेरणी क्षेत्रात आणि पिकांच्या उत्पादकतेत वृद्धी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.

Improvement of hydroelectric irrigation campaign, double sowing area and increase in crop production | जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती, दुबार पेरणी क्षेत्र व पीक उत्पादकतेत वृद्धी

जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती, दुबार पेरणी क्षेत्र व पीक उत्पादकतेत वृद्धी

googlenewsNext

- जयंत धुळप 
अलिबाग : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे रायगड जिल्ह्यात दुबार पेरणी क्षेत्रात आणि पिकांच्या उत्पादकतेत वृद्धी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. पीक उत्पादकता वाढ मोजण्यासाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगांतून हे निष्कर्ष प्राप्त होवू शकले आहेत. प्रयोगांती प्राप्त निष्कर्षानुसार जिल्ह्यात तांदळाची (भाताची) उत्पादकता ८.२१ क्विंटलने तर नाचणीची उत्पादकता १.८१ क्विंटल प्रति हेक्टर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.जलयुक्त शिवार अभियानात राबविण्यात आलेल्या जलसंधारण उपचारांच्या विविध कामांमुळे हे परिणाम साध्य होवू शकले आहेत.
येत्या काळात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन रब्बी हंगामाकरीता रायगड जिल्हयातील उर्वरित तालुक्यात पाणी उपलब्ध झाल्यास उन्हाळी भातशेती व पालेभाजी उत्पादनातून रोजगार उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे जिल्हयातून रोजगाराकरीता होणारे स्थलांतर मोठयाप्रमाणात थांबू शकेल व शेतकरी कुटूंबात आर्थिक उन्नतीसह स्थैर्य येऊ शकेल असा विश्वास शेतकऱ्यांचा आहे.
>भूगर्भ जलपातळी वाढीसह, जमीन ओलाव्यात वाढ
जलसंधारण उपचारांमुळे भूगर्भातील जलपातळी वाढतानाच जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे साहजिकच पिकांच्या उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम होऊन उत्पादकता वाढते. सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील कामांचा एकत्रित परिणाम अभ्यासण्यासाठी जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले होते.
>दोन वर्षांत जिल्ह्यातील ८३ गावांत जलसंधारण उपचाराची २११६ कामे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षात जिल्ह्यातील ८३ गावांत जलसंधारण उपचाराची एकुण २११६ कामे घेण्यात आली होती. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४५ गावांमध्ये ९७० जलसंधारण उपचाराची कामे हाती घेण्यात आली होती. या सर्व कामांवर ३० कोटी ९० लाख ६८ हजार रु पये निधी खर्च करण्यात आला होता,तर २०१६-१७ मध्ये ३८ गावांमध्ये ११४६ कामे हाती घेण्यात आली होती.
>रब्बीच्या क्षेत्रात ९.९० हेक्टरने वाढ
जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील दुबार पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २०१४-१५ मध्ये रब्बीचे क्षेत्र जिल्ह्यात १८.५४ हेक्टर होते. ते २०१६-१७ मध्ये २८.४४ झाल्याचे दिसून आले. परिणामी रब्बी क्षेत्रात ९.९० हेक्टर क्षेत्राची वाढ झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे २५१.६७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असल्याचा निष्कर्ष देखील कृषी विभागास प्राप्त झाला आहे.
>भाताच्या उत्पादकतेत
८.२१ क्विंटल प्रतिहेक्टर वाढ
पीक कापणी प्रयोग जिल्ह्यातील मुरु ड, महाड, पोलादपूर आणि म्हसळा या चार तालुक्यात भात पिकासाठी राबविण्यात आले होते. या चारही तालुक्यात एकूण १८ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण उपचाराची विविध कामे करण्यात आली होती. या चारही तालुक्यांची सरासरी भात पिकाची उत्पादकता २४.९३ क्विंटल प्रति हेक्टर इतकी होती. जलयुक्त शिवार अभियानाच्या जलसंधारण उपचारानंतर भात पिकाची ही उत्पादकता वृद्धिंगत होवून ३३.१४ क्विंटल प्रति हेक्टर झाल्याचे दिसून आले. परिणामी भात पिकाच्या उत्पादकतेत ८.२१ क्विंटल प्रति हेक्टर वाढ झाल्याचा निष्कर्ष प्राप्त झाला आहे.
>नाचणी उत्पादकतेत १.८१ क्विंटल प्रतिहेक्टरी वाढ
भाताप्रमाणेच नाचणीच्या पिकाकरिता पेण,खालापूर, सुधागड, महाड आणि श्रीवर्धन या पाच तालुक्यांमधील गावांमध्ये नाचणी पीक कापणी प्रयोग करण्यात आले. या पाच तालुक्यातील २० गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश होता. या पाचही तालुक्यांत मिळून सरासरी नाचणी उत्पादन हे ६.९५ क्विंटल प्रति हेक्टर होते ते जलयुक्त शिवार अभियानानंतर ८.७६ क्विंटल प्रति हेक्टर इतके वाढल्याचे दिसून आले. परिणामी नाचणी पिकाच्या उत्पादकतेत १.८१ क्विंटल प्रति हेक्टर इतकी वाढ झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.
>भाजीपाला नगदी पिकांकडे कल
जिल्ह्यातील शेतकरी आता दुबार पीक पद्धतीकडे वळत आहेत. दुबार पीक पद्धतीत भाजीपाला लागवडीकडेही शेतकºयांचा अधिक कल दिसून येत आहे. भाजीपाला हे पीक नगदी असल्याने शेतकरी भाजीपाल्याची लागवड अधिक करताना दिसत आहेत. शिवाय भाजीपाल्याला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध असते. याशिवाय कलिंगडही काही शेतकºयांनी लावले असून त्यांनी चांगले उत्पादन घेण्यास सुरु वात केली आहे. जलयुक्त शिवारमुळे विहिरींच्या पाण्यात वाढ झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हे विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला उत्पादन घेताना दिसत आहेत.

Web Title: Improvement of hydroelectric irrigation campaign, double sowing area and increase in crop production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.