- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील दासगावमध्ये रिमझिम पाऊस सुरू असताना बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठ्या धमाक्यासोबत भरवस्तीत अचानक वीज कोसळली. यावेळी आगीचा गोळा घरातील एका खिडकीतून आत शिरून दुसऱ्या खिडकीतून बाजूने जात नारळाच्या झाडावर आदळला. यात झाड खाक झाले असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
महाड तालुक्यातील दासगाव येथे बुधवारी पावसासह विजाही चमकत होत्या. रात्री आठ वाजता अचानक येथील मोहल्ला परिसरात मोठा धमाका झाला. भीतीने नागरिक घराबाहेर पडले. भरवस्तीत घरासमोरील रस्त्यावरच वीज कोसळली. त्याठिकाणी रस्ता शुभ्र होत तडकला आणि त्याच परिसरातील इम्रान बळी यांच्या घराच्या मागच्या खिडकीतून आगीचा एक गोळा आला आणि पुढच्या खिडकीतून बाहेर पडत बाजूलाच असलेल्या नारळाच्या झाडावर गेल्याने त्या झाडाने पेट घेतला.
मी माझ्या घराच्या गॅलरीत बसले होते. अचानक आवाज होऊन आगीचा गोळा या रस्त्यावर पडला आणि तिथून पेटत समोर निघून गेला. - ताजबी अनवारे, ग्रामस्थ
आवाज झाला तेव्हा मी घरात होते. माझ्यासमोर घराच्या मागच्या खिडकीतून आगीचा गोळा घरात आला आणि समोरच्या खिडकीतून बाहेर गेला. काही काळ मला काही समजले नाही. या घटनेदरम्यान घरामध्ये मी आणि माझी तीन मुले होतो. आम्ही थोडक्यात वाचलो. - साजिया बळी, ग्रामस्थ
कुटुंब बचावले; दहशतीचे पसरले वातावरणआगीचा गोळा शिरलेल्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू जळल्या. घरामध्ये तीन लहान मुले आणि त्यांची आई असे चार लोकांचे कुटुंब होते, ते थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.