निखिल म्हात्रे, अलिबाग : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर, संध्याकाळी तो २६ पर्यंत खाली येत असल्याने असह्य उकाडा आणि गारवा अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव येथे येत आहे. गुरुवारनंतर तापमानाचा पारा आणखी पाच ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे.
गुलाबी थंडीचा आनंद लुटल्यानंतर रायगडकर आता उन्हाच्या झळांनी घामाघूम होऊ लागले आहेत. शुक्रवारी कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी नागरिक थंड पेयांना पसंती देत आहेत.
रायगडात गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होऊ लागला आहे. याचा परिणाम तापमानावर झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान आता ३३ अंशांवर जाऊ लागले आहे, असे जाणकार सांगतात.
मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये. पण, काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माठांची मागणी वाढली आहे. यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट आहेत. - दीपक पाटील, माठ विक्रेता
उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली आहे. मात्र, थंड पदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारीरिक तक्रारींना कारण ठरू शकतात.- डाॅ. विनित शिंदे