अलिबागमध्ये तृणधान्यांतून सकस आहार घेण्याचे विद्यार्थ्यांना धडे
By निखिल म्हात्रे | Published: August 31, 2023 06:07 PM2023-08-31T18:07:31+5:302023-08-31T18:09:03+5:30
कृषी विभागाचा हा अभिनव उपक्रम बालकांपासून युवकांना सकस आहार घेण्याकडे प्रवृत्त करणारा ठरत आहे.
अलिबाग : सोशल मीडिया, फास्टफूडच्या युगात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाइल आणि भोजनात सकस आहाराऐवजी बर्गर, पिझ्झाचा समावेश होत आहे. यामुळे बालकांपासून युवा वर्गात विविध आजारांची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आहारात पौष्टिक तृणधान्ये मिळाली आणि तेच खाण्याची सवय लागली तर भावी काळातील युवा पिढी सुदृढ तयार होईल, या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागातर्फे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मनावर पौष्टिक तृणधान्यांचा आहार घेण्याचे बिंबवले जात आहे. शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
कृषी विभागाचा हा अभिनव उपक्रम बालकांपासून युवकांना सकस आहार घेण्याकडे प्रवृत्त करणारा ठरत आहे. या उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत आहे. गतिमान युगात सोशल मीडियाचा मोठा प्रभाव लहान विद्यार्थ्यांवर होत आहे. पुस्तकांऐवजी तसेच प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळण्याऐवजी लहान मुले मोबाइल आणि व्हिडीओ गेममध्ये अडकल्याचे चित्र आहे. याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर आणि शारीरिक वाढीवर होत आहे. लहान वयातच ४० टक्के विद्यार्थ्यांना चष्मा लागून विविध विकार जडल्याचे चित्र सर्वत्र आहे. यामुळे डिसेंबर २०२२ पासून जिल्ह्यातील शाळांमध्ये कृषी विभागाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून गावागावांतील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळांमध्ये जाऊन पौष्टिक तृणधान्यांची माहिती दिली जात आहे. रांगोळी, भित्तिपत्रक, चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे शाळांमध्ये जाऊन पौष्टिक तृणधान्य शरीराला कसे उपयोगी आहे, त्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले आहे.
- उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी