अलिबाग : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन राज्यात सत्ता मिळाली आहे. असे असले तरी मतदानाची टक्केवारी पाहता भाजपला साडे चार कोटी तर काँग्रेसला साडे सात कोटी मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे हजार ते पाच हजार या कमी फरकाने उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा चिन्हावर लढविणाऱ्या निवडणुका घेण्याचे धाडस करीत नाही आहे. भाजपने महाराष्ट्राची सुसंस्कृत संस्कृती पुसण्याचे काम केले आहे. बिहार, युपी राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्याची वाईट अवस्था केली असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला आहे. लोकसभा पुढे ढकलण्याची तरतूद असती तर तेही भाजपने केले असते अशीही टीका गीते यांनी केली आहे.
अलिबाग तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा बुधवारी भाग्यलक्ष्मी सभागृहात अनंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघात अनंत गीते हे मेळावे घेऊन पदाधिकारी, शिवसैनिक याना मार्गदर्शन करीत आहेत. मेळाव्यात पदाधिकारी यांनाही कान पीचक्या दिल्या. भाजपच्या सुरू असलेल्या राजकारण बाबतही गीते यांनी आसूड ओढले. संपर्क प्रमुख विष्णू पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा युवा अधिकारी अमीर ठाकूर, संघटक सतीश पाटील, तालुकाप्रमुख शंकर गुरव, शहर प्रमुख संदीप पालकर, महिला पदाधिकारी, शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित होते.
रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मी मागून घेतली आहे. दोन खासदार आणि नऊ आमदार हे इंडिया आघाडीचे निवडून येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे २२ खासदार आणि विधानसभेत २०५ आमदार निवडून येतील असा विश्वास अनंत गीते यांनी बोलून दाखवला. पक्ष संघटन मजबूत करणे हे पहिले काम आहे. शिवसेनेमध्ये झालेली गद्दारीमुळे बांधणी बिघडली आहे. ती करायची आहे. पदाधिकारी हे फोटो लावण्यावरून नाराजी दर्ष दर्शवतात. त्याऐवजी आपले काम करा. शिवसेनेकडे साखळी आहे ती इतर पक्षाकडे नाही आहे. पक्ष आदेशावर चालतो, पदाची किमंत व्यक्ती वाढवत असतो. आपल्यातील रुसवे फुगवे सोडून कामाला लागा. आगामी येणाऱ्या निवडणुका ह्या इंडिया आघाडीतून लढवायच्या आहेत. अशा सूचना गीते यांनी मेळाव्यातून केल्या आहेत. सुरेंद्र म्हात्रे, विष्णू पाटील आणि इतर पदाधिकारी यांनी भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.