जेएनपीएत हर घर तिरंगा; स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:02 PM2023-08-15T17:02:54+5:302023-08-15T17:05:00+5:30
जेएनपीएने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीएने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जनेपप्रा प्रशासन भवन येथे जेएनपोर्ट समुदायाने उत्सवात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी जेएनपीएचे विभाग प्रमुख आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकारी यांच्या उपस्थित होते.
"स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करत असताना गेल्या वर्षभरात जेएनपीएने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. बंदराच्या वैविध्यपूर्ण कामगिरी आणि योगदानामुळे विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या सागरी क्षेत्राने आणि बंदरांनी देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जेएनपोर्टने ३४ वर्षांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही सर्वोत्तम- भारतातील बंदराची कामगिरी कायम ठेवत येत्या काही दिवसांत जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू." अशी ग्वाही स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात बोलताना उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी दिली. यावेळी आझादी का अमृत महोत्सवात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या हस्ते गौरवही केला.
जेएनपीएने भारत सरकारच्या बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ज्यामुळे कर्मचारी आणि नागरिक या दोघांनाही लाभ झाला. या उपक्रमांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, बंदर क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी बंदरावर शैक्षणिक भेटी, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण उपक्रम आणि इतर काही उपक्रमांचा समावेश होता. उन्मेष शरद वाघ यांनी सर्व जेएनपीए कर्मचारी, कामगार विश्वस्त आणि भागधारकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य दिन उत्सवाचा समारोप केला.
यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकार्यांनी देशभक्ती या विषयावर केंद्रीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.जेएनपीए हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. २६ मे १९८९ रोजी स्थापन झाल्यापासून, जेएनपीए बल्क-कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदर बनले आहे. सध्या जेएनपीए न्हावा -शेवा फ्रंट टर्मिनल,न्हावा -शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल,एनएसआय, बीएमसीटी आणि एपीएमटी अशी पाच कंटेनर टर्मिनल्स चालवते. बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी शॅलो वॉटर बर्थ आणि दुसरा लिक्विड कार्गो टर्मिनल आहे. जो बीपीसीएल ,आयओसीएल कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेल्या कोस्टल बर्थद्वारे व्यवस्थापित केला जातो.